
तामिळनाडूच्या ‘स्वायत्तते’साठी CM स्टॅलिन यांनी घेतला मोठा निर्णय
तामिळनाडूच्या स्वायत्ततेबाबत उपाययोजनांची शिफारस करण्यासाठी आज (दि. १५) मुख्यमंत्री एमके स्टॅलिन ( MK Stalin) यांनी सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश कुरियन जोसेफ यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय समिती स्थापन केली. ही समिती संघराज्याशी संबंधित सर्व पैलूंचा अभ्यास करेल. तसेच तामिळनाडूच्या घटनात्मक हक्कांचे रक्षण करण्यासाठी शिफारसी करेल,” अशी घाेषणाही त्यांनी विधानसभेत केली.
काय आहे तामिळनाडू सरकारची मागणी?
स्टालिनच्या नेतृत्वाखालील द्रमुक सरकारचे नीट, भाषा धोरण, कुलगुरूंची नियुक्ती आणि सीमांकन यासह अनेक प्रमुख मुद्द्यांवर मोदी सरकारशी संघर्ष सुरु आहे. शिक्षणाचा समावेश समवर्ती यादीत आहे. याचा अर्थ शिक्षण विभाग हे राज्ये आणि केंद्र यांच्याकडून प्रशासित केले जाते. परंतु श्री. स्टॅलिन यांनी शिक्षण विभाग हा केवळ राज्याचा विषय असावा, अशी मागणी केली आहे. शिक्षणाचा समवर्ती यादीत समावेश करण्यासाठी भारतीय राज्यघटनेतील ४२ व्या दुरुस्तीला रद्द करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. तसेच केंद्र सरकार भारताची संघराज्य रचना पद्धतशीरपणे कमकुवत करत आहे. अनेक महत्त्वाच्या बाबींवर केंद्र सरकार राज्याच्या अधिकारांना दुर्लक्षित करत आहे, असा आरोपही त्यांनी यावेळी केला
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी तामिळनाडू विधानसभेने दोनदा मंजूर केलेले विधेयक नाकारल्यानंतर NEET वाद चिघळला होता. वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी राज्याला बारावीच्या गुणांच्या आधारे प्रवेश घेण्याची परवानगी देण्यात यावी, अशी विनंती आमची विनंती केंद्र सरकारने नाकारली आहे. या प्रश्नी आमचा लढा अद्याप संपलेला नाही. या निर्णयाला आव्हान कसे द्यायचे याबद्दल आम्ही कायदेशीर तज्ञांचा सल्ला घेऊ,” असे स्टॅलिन यांनी यावेळी स्पष्ट केले.
तामिळनाडू आणि केंद्र यांच्यातील वादाचा आणखी एक प्रमुख मुद्दा म्हणजे राष्ट्रीय शिक्षण धोरणातील तीन-भाषिक सूत्र. याला द्रमुकने आक्षेप घेतला आहे. विद्यमान द्विभाषिक धोरणाने भारतीय अर्थव्यवस्थेत दुसऱ्या क्रमांकाचे योगदान देणाऱ्या राज्याची प्रगीती केली आहे. तसेच तीन-भाषिक धोरणाच्या अंमलबजावणीस विरोध केल्यानेच केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यावर शिक्षण निधीतील २,५०० कोटी रुपये रोखण्याची धमकी देऊन ‘ब्लॅकमेल’ करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही तामिळनाडू सरकारने केला आहे.