‘या’ मालिकेतून संजय नार्वेकर येणार हिंदी पडद्यावर…
भारतातील महत्त्वाच्या चॅनेलपैकी एक असलेल्या स्टार प्लसने टेलिव्हिजनच्या इतिहासातील अनेक उल्लेखनीय टीव्ही मालिका तयार केल्या आहेत. भारतीय घराण्यांमधला एक सुप्रसिद्ध टेलिव्हिजन शो म्हणजे ’गुम है किसी के प्यार में जो 2020 पासून प्रसारित होत आहे. या मालिकेत एका महत्त्वाच्या भूमिकेतून ज्येष्ठ अभिनेते हिंदी मालिका विश्वात पदार्पण करत आहेत. ‘गुम है किसीके प्यार में’ मधील कमल जोशी ही सईच्या वडिलांची व्यक्तिरेखा ते साकारत असून ही त्यांची पहिलीच हिंदी मालिका आहे.
‘गुम है किसीके प्यार में’ मधील कमल जोशी या त्यांच्या व्यक्तिरेखेबद्दल आणि सईसोबतच्या त्यांच्या बॉण्डिंगबद्दल संजय नार्वेकर म्हणतात, “गुम है किसी के प्यार में’ ही एक बाप-मुलीच्या नात्याची भावनिक कथा आहे, ती दोन प्रेमी आणि पती-पत्नीच्या कथेवर प्रकाश टाकते. सध्याच्या घडामोडींमध्ये कमल जोशी नावाचा एक प्रामाणिक पोलीस निरीक्षकाचा हा ट्रॅक आहे. बाप म्हणून त्यांचे आपल्या मुलीवर सईवर खूप प्रेम आहे आणि त्यांना तिच्यासाठी सारे काही उत्तम हवे आहे. त्यांना तिला सुरक्षित आणि आनंदी ठेवायचे आहे. मात्र त्यांचे हे प्रेम आंधळे नाही, कधीकधी ते मुलीशी कठोर देखील होतात. कमल जोशी सईला ‘माझी आई’ म्हणून संबोधतात आणि ती त्यांना आबा म्हणते. बाप आणि मुलीमधले अतिशय सुरेख बंध या निमित्ताने रेखाटण्यात आल्याचे नार्वेकर म्हणाले.
“कमल जोशी दोन भूमिकांमध्ये विभागलेला आहे, एक वडिलांची आणि दुसरी इन्स्पेक्टरची. सईला आई नाही आणि कमल तिच्यासाठी वडील आणि आईची दुहेरी भूमिका साकारत आहेत. हे पात्र कठोर आहे पण त्याचे आपल्या मुलीवरचे प्रेम त्याला खूप भावूक करते.”, असे नार्वेकर म्हणाले.
स्टारप्लस ‘गुम है किसके प्यार में’ मध्ये नील भट्ट एसीपी विराटच्या भूमिकेत, सई जोशीच्या भूमिकेत आयशा सिंग आणि पत्रलेखाच्या भूमिकेत ऐश्वर्या शर्मा असून याचे प्रसारण सोमवार ते शनिवार रात्री 8:00 वाजता केवळ स्टार प्लस वाहिनीवर करण्यात येते.