‘मंत्री नसतील तर थेट मला संपर्क करा’
मुंबई:
राज्यात सुरू असलेल्या राजकीय पेचप्रसंगाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सरकारी अधिकाऱ्यांशी संवाद साधला
या बैठकीत मुख्यमंंत्र्यांनी फ्रंटफुटवर बॅटींग केली आहे. राजकारण आणि पाऊस यांची नेहमीच अनिश्चितता असते. राजकारणाचे डावपेच चालतच राहतील पण त्यामुळे राज्य कारभार थांबला आहे असे मुळीच होता कामा नये. लोकांचे दैनंदिन प्रश्न आणि समस्या सोडविण्याकडे प्रशासनाचे लक्ष असले पाहिजे असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पालिका आयुक्त तसेच मंत्रालयातील विविध विभागांच्या सचिवांच्या बैठकीत विविध कामांचा विस्तृत आढावा घेतला.
कोरोना, पेरण्या, खतांची उपलब्धता त्याचप्रमाणे आपत्ती व्यवस्थापन तयारी, आषाढी वारीतील वारकऱ्यांच्या सुविधा याविषयी महत्वाच्या सूचनाही केल्या. जनतेशी संबंधित महत्वाची कामे थांबवून ठेऊ नका , ती थेट तातडीने माझ्याकडे घेऊन या असेही निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. सरकार येतं जातं, तुम्ही अधिकारी कायम असतात. प्रॉब्लेम तुम्हीच आणतात,सोल्युशनही तुमच्याकडेच असतं.
अडीच वर्ष तुम्ही मला सांभाळून घेतलं. निर्देश देतोय आता अंमलबजावणीसाठी मी असेल का माहिती नाही. याचा अर्थ मी हरलो असा नाही. उद्यापासून माझ्या राजकीय लढाईला सुरूवात होत आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यापूर्वी शिवसेना जिल्हप्रमुखांशी बोलताना पक्षातील बंडखोरांना इशारा दिला. मी त्यादिवशी मनातलं सगळं सांगितलं, आजही मन मोकळं करणार आहे. मी वर्षा सोडली म्हणजे मोह सोडला, जिद्द सोडली नाही. स्वप्नातसुद्धा मी विचार केला नव्हता की मी या पदावर जाईन, त्या पदाचा मला कधीच मोह नव्हता, असं ठाकरे यांनी यावेळी सांगितलं.