वेव्हज फिल्म बाजारची भव्य उद्घाटन सोहळ्याने सुरुवात
दक्षिण आशियाची जागतिक चित्रपट बाजारपेठ असलेल्या वेव्हज फिल्म बाजारचा आज गोव्यातील पणजी येथील मॅरियट रिसॉर्ट येथे एका प्रेरणादायी उद्घाटन सोहळ्याने प्रारंभ झाला, ज्यामध्ये नेते, धोरणकर्ते, चित्रपट निर्माते आणि जागतिक प्रतिनिधी आदी मान्यवर उपस्थित होते. दरवर्षी प्रतिष्ठित भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासोबत आयोजित केल्या जाणाऱ्या या बाजाराचे यंदाचे 19 वे वर्ष असून आता तो वेव्हज फिल्म बाजार म्हणून ओळखला जातो. सर्जनशील आणि आर्थिक भागीदारीच्या शोधात असलेले चित्रपट निर्माते, निर्माते, विक्री एजंट, महोत्सव आयोजक आणि वितरकांसाठी हे एकत्र येण्याचे ठिकाण बनले आहे. हा बाजार 20 ते 24नोव्हेंबर दरम्यान आयोजित करण्यात आला आहे.
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू यांनी आपल्या उद्घाटन भाषणात वेव्हज फिल्म बाजारचे वर्णन इफ्फी सोहळ्याची स्वाभाविक आणि समर्पक सुरुवात असे केले. त्यांनी वेव्हज फिल्म बाजार हा “स्क्रीनिंग्ज, मास्टरक्लासेस आणि तंत्रज्ञान प्रदर्शनांची संपूर्ण परिसंस्था” असल्याचे नमूद केले आणि वेव्हजची नवीन ओळख “कलेचे व्यापार संधीत रूपांतर करण्याच्या” पंतप्रधानांच्या दृष्टिकोनाला अनुरूप आहे यावर भर दिला.
त्यांनी चित्रपट निर्मात्यांसाठी जगातील ही पहिली ई-मार्केटप्लेस असल्याचे अधोरेखित केले आणि वेव्ह्ज “सर्जनशील निर्माते आणि देशांना जोडत आहे, ज्यामुळे भारत हा जागतिक सहकार्यासाठी एकत्र भेटण्याचे ठिकाण बनले आहे यावर भर दिला.” त्यांनी क्युरेटेड प्रकल्प, रोख अनुदान आणि रचनात्मक अभिप्राय प्रक्रियांच्या विस्तृत श्रेणीचा उल्लेख केला, तसेच भारतातील पहिल्या एआय चित्रपट महोत्सव आणि हॅकेथॉन हे सिनेमॅटिक तंत्रज्ञानाच्या भविष्याला स्वीकारण्याच्या दिशेने आवश्यक पावले असल्याचे अधोरेखित केले.
सन्माननीय अतिथी म्हणून कोरिया प्रजासत्ताकच्या राष्ट्रीय सभेच्या सदस्य जावोन किम यांनी महोत्सवाच्या पहिल्या आवृत्तीपासून दिसत असलेल्या आयोजकांच्या वचनबद्धतेचे आणि सातत्याचे कौतुक केले. भारत आणि कोरिया यांच्यातील सक्रिय सहकार्याची आशा व्यक्त करताना त्यांनी वंदे मातरमचे भावपूर्ण सादरीकरण देखील केले, ज्याला प्रेक्षकांनी टाळ्या तसेच उभे राहून दाद दिली.
माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन यांनी बाजाराचे उद्घाटन करताना भारताला चित्रपट निर्मितीचे जागतिक केंद्र म्हणून उदयास आणण्याच्या पंतप्रधानांच्या दृष्टिकोनाबद्दल सांगितले. हा मंच म्हणजे “निर्माणक आणि निर्मात्यांमधील सेतू” असल्याचे विशद करून त्यांनी तरुण आवाज आणि नवीन कथाकारांना सक्षम बनवण्यासाठी मंचाची प्रशंसा केली, यावर्षी बाजारातील 124 नवीन निर्मात्यांच्या सहभागाची नोंद घेत त्यांनी भारतीय संस्कृती आणि आशय जगासमोर नेणारी बाजाराची भूमिका पुन्हा अधोरेखित केली.
अतिरिक्त सचिव प्रभात यांनी समारंभात आभाराचे शब्द व्यक्त केले. उद्घाटन समारंभाला इफ्फी महोत्सवाचे संचालक आणि प्रसिद्ध चित्रपट निर्माते शेखर कपूर; अभिनेते नंदमुरी बालकृष्ण आणि अनुपम खेर; वेव्हज बाजारचे सल्लागार जेरोम पैलार्ड; ऑस्ट्रेलियन चित्रपट संचालक गार्थ डेव्हिस; आणि एनएफडीसीचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश मगदूम हे देखील उपस्थित होते.






