दिल्ली विमानतळावर एअर इंडियाचा नवा एमआरओ हँगर
नवी दिल्ली: एअर इंडियाने दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर अत्याधुनिक देखभाल, दुरुस्ती आणि ओव्हरहॉल (एमआरओ) हँगर उभारण्यासाठी भूमिपूजन केले. नऊ एकर क्षेत्रात उभारण्यात येणाऱ्या या सुविधेत एकाच वेळी एक वाइडबॉडी आणि एक नॅरोबॉडी विमान ठेवता येणार आहे.
या हँगरमुळे विमानांची देखभाल, तांत्रिक दोषांची दुरुस्ती आणि केबिनच्या देखभालीची कामे एकाच ठिकाणी करता येतील. परिणामी, देखभालीसाठी विमानांना जमिनीवर थांबावे लागणारा कालावधी कमी होण्यास आणि विमानांची उपलब्धता वाढण्यास मदत होईल, असा दावा एअर इंडियाने केला आहे.
या सुविधेत सुट्या भागांसाठी गोदाम, एकात्मिक अभियांत्रिकी कार्यालये आणि केबिन दुरुस्तीसाठी स्वतंत्र विभाग असेल. भविष्यातील मोठ्या विमानांच्या गरजा लक्षात घेऊन हँगरची रचना करण्यात आली आहे. ऊर्जा व पाण्याची बचत आणि अग्निसुरक्षेच्या उपाययोजनांवरही भर देण्यात येणार आहे.
या प्रकल्पामुळे भारतातील विमान देखभाल क्षेत्राची क्षमता वाढण्यास आणि परदेशातील एमआरओ सुविधांवरील अवलंबित्व कमी करण्यास हातभार लागण्याची अपेक्षा आहे.






