‘दर दहा दिवसांनी काँग्रेसचे आमदार फोडणार!’
अहमदाबाद:
गुजरातमधील (Gujarat) पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल (Hardik Patel) यांनी 15 दिवसांपूर्वी काँग्रेसला (Congress) रामराम केला होता. त्यांनी आज भाजपमध्ये (BJP) प्रवेश केला आहे. यामुळे विधानसभा निवडणुकीआधी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. असे असतानाच आता हार्दिक पटेल यांनी दर दहा दिवसांची पक्ष प्रवेशाचा मोठा कार्यक्रम घेण्याचे जाहीर केले आहे. यात काँग्रेस आमदारांसह नेत्यांचे भाजपमध्ये प्रवेश होतील, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
हार्दिक पटेल यांचा गांधीनगरमध्ये झालेल्या मोठ्या कार्यक्रमात पक्षप्रवेश झाला. त्यावेळी उपमुख्यमंत्री नितीन पटेल, भाजपचे प्रदेशाध्यक्ष सी.आर.पाटील यांच्यासह पक्षाचे अनेक नेते आणि सरकारमधील मंत्री उपस्थित होते. या वेळी बोलताना हार्दिक पटेलांनी पुढील रणनीती स्पष्ट केली. ते म्हणाले की, काँग्रेसचे आमदार आणि नेत्यांना भाजपमध्ये प्रवेश करता यावा, यासाठी दर दहा दिवसांनी मी कार्यक्रम घेणार आहे. या कार्यक्रमातून काँग्रेस नेत्यांना भाजपमध्ये प्रवेशाचे आवाहन करण्यात येईल. काँग्रेस पक्ष सध्या कोणतेही काम करण्याच्या मानसिकतेत नाही. इतर पक्षांतील नेत्यांनी भाजपमध्ये यावे, असे आवाहन मी करतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संपूर्ण जगाचा अभिमान आहेत.
हार्दिक यांनी 19 मे रोजी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली होती. यानंतर 15 दिवसांतच ते भाजपध्ये दाखल झाले आहेत. आज भाजपमध्ये दाखल होण्याआधी हार्दिक पटेलांनी ट्विट करत आगामी भूमिका स्पष्ट केली होती. ते म्हणाले होते की, देशहित, राज्यहित, जनहित आणि समाजहिताची भावना डोळ्यासमोर ठेवून मी आज एका नवा अध्यायाची सुरवात करीत आहे. भारताचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशहितासाठी सुरू असलेल्या भगिरथ कार्यात मी एका छोटा सैनिक बनून काम करेन.