‘…अशाच पद्धतीने शिवसेनेचे खच्चीकरण करण्यात येत होते’
मुंबई :
शिवसेनेतील बंडखोरीनंतर ठाकरे सरकारने मोठा निर्णय घेत बंडखोर ३८ आमदारांची सुरक्षा काढल्याचा आरोप झाला आहे. यानंतर बंडखोर गटाचे नेते एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील व पोलीस विभागाला पत्र लिहून आपला संताप व्यक्त केला आहे. यात त्यांनी ३८ आमदारांची यादी देत या आमदारांची आणि त्यांच्या कुटुंबीयांची सुरक्षा काढून घेण्यात आल्याचं सांगितलं. तसेच त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी सरकारची असल्याचं नमूद केलं. त्यांनी ट्वीट करत आपली भूमिका स्पष्ट केली.
एकनाथ शिंदे म्हणाले, “मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्या आदेशाने राजकीय आकसापोटी शिवसेनेच्या आमदारांचे संरक्षण काढून घेण्यात आले आहे. त्यांच्या व त्यांच्या कुटुंबीयांच्या संरक्षणाची जबाबदारी सरकारची आहे.”
“गेल्या अडीच वर्षात मविआतील घटक पक्षांकडून अशाच पद्धतीने शिवसेनेचे खच्चीकरण करण्यात येत होते व आहे,” असंही एकनाथ शिंदे यांनी नमूद केलं.
एकनाथ शिंदे यांनी पाठवलेल्या पत्रात म्हटलं आहे, “आम्ही विद्यमान आमदार आहोत, तरीही प्रोटोकॉलप्रमाणे आम्हाला आणि आमच्या कुटुंबीयांना दिलेली सुरक्षा बेकायदेशीरपणे काढण्यात आली आहे. हे राजकीय सुडापोटी केलं जात आहे. याचा वापर करून काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या गुंडांचा सहभाग असलेल्या महाविकासआघाडीच्या मागण्या मान्य करण्याचा प्रयत्न केला जात आहे.”
“आम्हाला सुरक्षा देण्याचं कारण आमच्या जीवाला असलेला धोका आहे. आम्ही कोणत्या बाजूचं राजकारण करतो यावरून सुरक्षा देण्याचा निर्णय होत नाही. असं असलं तरी ज्या धोक्यामुळे आम्हाला महाराष्ट्र सोडावा लागला तेच आता महाविकासआघाडीच्या नेत्यांच्या या कृतीने सिद्ध झालं आहे,” असा आरोप या पत्रात करण्यात आला.