काँग्रेस नेते आणि शरद पवारांमध्ये चर्चा
मुंबई :
शिवसेनेतील बंडखोरीनंतर राज्यातील महाविकासआघाडीचं स्थैर्य धोक्यात आलं आहे. या पार्श्वभूमीवर महाविकासआघाडीच्या घटकपक्षांकडून बैठकांवर बैठका सुरू आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्वतः मातोश्रीवर जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यानंतर आता आघाडीतील घटकपक्ष असलेल्या काँग्रेसच्या नेत्यांनी सिल्व्हर ओक या निवासस्थानी जाऊन शरद पवार यांची भेट घेतलीय. दुसरीकडे बंडखोर मंत्री एकनाथ शिंदे यांनीही आपल्या गटाची बैठक बोलावली आहे.
काँग्रेसचे विधीमंडळ नेते बाळासाहेब थोरात व अशोक चव्हाण यांनी मुंबईत सिल्व्हर ओक येथे शरद पवार यांची भेट घेतली. तसेच राज्यातीलय राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर चर्चा केली. या बैठकीत महाविकासआघाडीच्या स्थैर्याबाबत रणनीती तयार करण्यात आल्याचीही चर्चा आहे.
दुसरीकडे एकनाथ शिंदे गुवाहटी येथून बंडखोरांचं नेतृत्व करत आहेत. शिंदे गटाकडून गुवाहटीत बैठका घेतल्या जात आहेत. बंडखोर आमदारांनी आपल्याबाबतचे निर्णय घेण्याचे सर्वाधिकार एकनाथ शिंदे यांना दिले आहेत. याशिवाय एकनाथ शिंदे यांनी बंडखोरांच्या वतीने बाजू मांडण्यासाठी आमदार दीपक केसरकर यांना जबाबदारी दिली आहे. त्यामुळे माध्यमांना प्रतिक्रिया देणं टाळणारे बंडखोर माध्यमांशीही बोलताना दिसत आहेत.