”त्या’ आमदारांवर एफआयआर का दाखल करण्यात आला नाही?’
पणजी :
राज्यातील विविध धार्मिक स्थळांवर जाउन निष्ठेची शपथ घेतलेल्या आणि भाजप प्रवेश करताना ती मोडून लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी गोवा पोलिसांनी आठ पक्षांतरित गद्दार (देशद्रोही) यांच्यावर एफआयआर का नोंद केला नाही असा सवाल काँग्रेसचे माजी अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी मंगळवारी केला.
“आम्ही अधिकृत तक्रार दाखल करूनही, पोलिसांनी कारवाई केली नाही आणि आज आम्ही पाहतो की पोलिसांनी स्वतःहून दखल घेत दोन मुलींवर इन्स्टाग्रामवर एका पोस्टद्वारे धार्मिक भावना दुखावल्याबद्दल गुन्हा नोंदवला. गोवा पोलीस वेगवेगळ्या लोकांसाठी वेगवेगळे कायदे का लावत आहेत? ’ असा सवाल चोडणकर यांनी केला.
“भाजपमध्ये आल्यानंतर सर्व गुन्हे धुतले गेल्याचे दिसते आणि त्यामुळे देवाची आणि गोव्यातील जनतेची फसवणूक करणाऱ्या देशद्रोह्यांवर कोणतीही कारवाई झालेली नाही,” असेही ते म्हणाले.
चोडणकर यांनी निदर्शनास आणून दिले की गद्दर आमदारांच्या कृतीचे व्हिडिओ आणि फोटो व्हायरल झाले होते, ज्यामध्ये ते देवाची फसवणूक करताना आणि तीन वेगवेगळ्या धर्मांचा अनादर करताना आणि लाखो लोकांच्या धार्मिक भावना दुखावताना दिसत होते. परंतु तेव्हा पोलिसांनी अशी कारवाई दाखवली नाही.
चोडणकर म्हणाले, “कोणतीही तक्रार न करता इन्स्टाग्रामवर दोन मुलींनी पोस्ट टाकल्याच्या घटनेत पोलिसांनी तत्परतेने कारवाई केली. यामुळे गोव्यात मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील दोन वेगळे कायदे आहेत का, असा प्रश्न निर्माण होतो,” असे चोडणकर म्हणाले.
राज्याचे गृहमंत्री असलेले प्रमोद सावंत यांनी या प्रश्नावर स्पष्टपणे यावे आणि समानतेने आणि पक्षपात न करता न्याय मिळावा, अशी जोरदार मागणी काँग्रेसचे माजी अध्यक्ष चोडणकर यांनी केली.
देशाचे कायदे सर्वांसाठी समान असल्याचा विश्वास जनतेत तेव्हाच निर्माण होईल जेव्हा सावंत आठही आमदारांविरुद्ध एफआयआर नोंद करणार असे ते म्हणाले.