
Parikrama : परिक्रमा 0.6 च्या ‘क्युरेटर’ आणि ‘रेफ्री’ यांची निवड
Parikrama : परिक्रमा नॉलेज टर्मिनसच्यावतीने आयोजित ‘Parikrama 0.6’ या सर्जनशील ज्ञानमहोत्सवाच्या क्युरेटर आणि रेफ्री यांची निवड नुकतीच जाहीर करण्यात आली. या महत्वाकांक्षी महोत्सवाच्या क्युरेटरपदी प्रसिध्द गोमंतकीय सिनेदिग्दर्शक जितेंद्र शिकेरकार यांची तर रेफ्री म्हणून सामाजिक कार्यकर्ते आणि कोंकणी चळवळीचे संघटक माल्कम डिकोस्टा यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.
राज्यातील विविध विद्यालये आणि महाविद्यालयांचा सक्रीय सहभाग असलेला ‘Parikrama 0.6’ पुढील महिन्यात, म्हणजेच जानेवारी 20 आणि 21 रोजी फोंड्यातील राजीव कला मंदिरात आयोजित होत आहे. गेल्याच आठवड्यात या महोत्सवाच्या ‘कार्यकारिणी’ची निवड करण्यात आली. त्यानंतर ‘क्युरेटर’ आणि ‘रेफ्री’ या महत्वाच्या पदांवरील नेमणुक कार्यकारिणीने नुकतीच जाहीर केली.
या ज्ञानमहोत्सवातील एकूण कार्यक्रम, कार्यक्रमांची गुणवत्ता आणि इतर रचनात्मक घटकांसंदर्भात ‘क्युरेटर’ महत्वपूर्ण सूचना देतात. तर, कार्यक्रमातील तक्रारींचे निराकरण करतानाच योग्य मार्गदर्शन देण्याचे काम ‘रेफ्री’ करतात. यापूर्वी क्युरेटर म्हणून श्रुती भोसले, सुरेल तिळवे, श्वेतांग नाईक आणि शिरीष नाईक यांनी काम पाहिले आहे.