‘केरीतील दुर्घटनेची सरकार जबाबदारी घेणार का?’
पणजी :
केरी समुद्रात 4 जणांचा बुडून मृत्यू झाल्याच्या बातमीने भाजप सरकारचे “मिशन टोटल कमिशन” पुन्हा एकदा उघड झाले आहे. पर्यटन खाते समुद्रकिनाऱ्यांवर येणाऱ्या लोकांच्या सुरक्षेसाठी करोडो रुपये खर्च करते पण दुर्दैवी घटना घडली तेव्हा जीवरक्षक आणि पर्यटक रक्षक कुठे होते? असा सवाल काँग्रेस मीडिया सेलचे अध्यक्ष अमरनाथ पणजीकर यांनी केला आहे.
पर्यटनमंत्री रोहन खवटे जबाबदारी स्वीकारून राजीनामा देणार का? पीडित आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या प्रती सहवेदना देत मुख्यमंत्री त्यांचा वाढदिवस सोहळा रद्द करतील का? असे प्रश्न विचारुन, डॉ. प्रमोद सावंत यांच्या बेजबाबदार, असंवेदनशील आणि भ्रष्ट भाजप सरकारने निरपराध कुटुंबांना उध्वस्त केले आहे, असा गंभीर आरोप अमरनाथ पणजीकर यांनी केला.
शोकाकुल कुटुंबियांप्रती कॉंग्रेस पक्षाच्यावतीने शोक व्यक्त करताना अमरनाथ पणजीकर यांनी आजच्या केरी येथिल बुडण्याच्या घटनेने समुद्रकिनारा सुरक्षा कंत्राट हा पर्यटन खात्याचा महाघोटाळा असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे असा दावा केला आहे.
काँग्रेस पक्षाने वेळोवेळी बीच सेफ्टी आणि लाईफ गार्डस कंत्राट घोटाळा आणि बीच क्लीनिंग कंत्राट घोटाळा उघड केला आहे. केरी बीचवरील घटनेने किनारे सुरक्षा कंत्राटदारांने सदर समुद्रकिनाऱ्यांवर पुरेसे जीवरक्षक तैनात केले नव्हते हे सिद्ध झाल्याचा दावा अमरनाथ पणजीकर यांनी केला आहे.
या दुर्देवी घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी आणि समुद्रकिनारा सुरक्षा कंत्राटदाराने गोव्यातील विवीध समुद्र किनाऱ्यांवर नेमलेले मनुष्यबळ आणि उपकरणे यांचे लेखापरीक्षण करावे. यावरून जनतेच्या पैशाची निष्पाप लोकांचे बळी घेत कशी लूट केली जाते हे सिद्ध होईल, असे अमरनाथ पणजीकर म्हणाले.