साताऱ्यात प्रवासी महिलांची होतेय मानसिक कुचंबना व आर्थिक लुट
सातारा (महेश पवार) :
सातारा मध्यवर्ती बस स्थानकातील स्वच्छतागृह ठेकेदाराची मनमानी सुरू असून प्रवासी महिलांकडून स्वच्छतागृह वापरासाठीचे पैसे उकळले जात आहेत. युरिनल पर्पजसाठी प्रवासी महिलांनी स्वच्छतागृह वापरल्यास त्यासाठी कोणताही चार्ज घेण्यास मनाई असताना संबंधित महिलांकडून उघडपणे पैसे उकळले जात आहेत.
विशेष म्हणजे ठेकेदाराने कामगार म्हणून नेमणूक केलेली महिला स्वच्छतागृहात आतमध्ये जाऊन प्रवासी महिला स्वच्छतागृहाचा वापर नेमका कशासाठी करताहेत याची देखरेख करीत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या प्रकारामुळे प्रवाशांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
एसटी प्रशासनाचे मात्र या गंभीर प्रकाराकडे दुर्लक्ष झाल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. प्रवासी महिला या प्रकाराबद्दल तक्रार करत असून सुद्धा त्याची दखल घेतली जात नाही. साताऱ्या सारख्या ऐतिहासिक शहरात महिला प्रवाशांची बसस्थानकात अशाप्रकारे मानसिक कुचंबना आणि आर्थिक लूट होत असेल तर ही बाब नक्कीच शोभनीय नाही. राजकीय पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी किमान या गंभीर प्रकाराची दखल घेऊन एसटी प्रशासनाला ताळ्या वर आणून हा गंभीर प्रकार थांबवावा अशी मागणी होत आहे.