
कास पठार परिसरात अवैध उत्खनन आणि शेकडो झाडांची कत्तल!
सातारा (महेश पवार) :
सातारा कास रस्त्यावर कास पठारापासून काही अंतरावर असलेल्या वन हद्दीलगतच्या जमिनीवर धनदांडग्यांनी भात खचराच्या नावाखाली बेसुमार उत्खनन आणि शेकडो झाडांची कत्तल केली आहे . आधी भात खचर करायचं आणि मग त्या ठिकाणी बेकायदेशीर बांधकाम उभी करायची यामुळे वर्ल्ड हेरिटेज दर्जा मिळालेल्या कास पठारावर सिमेंटचे जंगल तयार होतानाचे चित्र दिसत आहे.

सगळे कायदे नियम फाट्यावर मारत ही भयावह परिस्थिती होत आहे , हे सर्व वन विभागाच्या आणि महसूल विभागाच्या आशिर्वादाने सुरू आहे काय ?असा प्रश्न उपस्थित होत आहे . वन विभागाच्या पथकाचे रोज अनेक हेलपाटे होत असतात तरी देखील याठिकाणी सुरू असलेली वृक्षतोड संबंधितांना दिसली नाही का ? वन समित्या फक्त पैसा गोळा करायला असतात का?जर जंगलच राहिले नाही तर भविष्यात पर्यटक कसे येणार आणि मग कोणाच्या पावत्या फाडून पैसे घेणार . यामुळे याठिकाणी सुरू असलेला प्रकार थांबवून कास पठार वाचविण्याची खरतर गरज आहे.
कास पठार परिसरात धनदांडग्यांनी आणि राजकीय व्यक्ती नी प्रशासनाला हाताशी धरून कास पठाराचे वैभव नष्ट करण्याची सुपारी तर घेतली नाही ना ? असा सवाल या ठिकाणी फिरायला येणारे पर्यटक करत आहेत .
