‘डिकॉस्टा हाऊस’ पुन्हा झाले हाउसफुल
राज्यभरातील सिनेगृहामध्ये गाजलेला आणि इफ्फीमध्ये विशेष उत्साही प्रतिसाद लाभलेला डिकॉस्टा हाऊस हा जितेंद्र शिकेरकर, लिखित दिग्दर्शित आणि प्रमोद साळगावकर निर्मित कोंकणी सिनेमा पुन्हा एकदा हाउसफुल ठरला आहे. नुकताच हा सिनेमा सिनेलाईफ या नव्या कोंकणी ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात आला आणि त्यानंतर पहिल्या दिवसापासूनच या सिनेमाला उत्तम प्रतिसाद लाभत असल्याने, सिनेमाच्या कलाकारांनी विशेष समाधान व्यक्त केले आहे.
गेल्या काही वर्षांपासून कोंकणीमध्ये वेगवेगळ्या प्रयोगात्मक सिनेमांची निर्मिती होत आहे. प्रसिद्ध सिनेमा लेखक आणि दिग्दर्शक जितेंद्र शिकेरकर यांचा डिकॉस्ता हाऊस हा सिनेमा प्रयोगात्मक आणि व्यावसायिकरीत्या अशा दोन्ही प्रकारच्या प्रेक्षकांना आवडला. सस्पेन्स थ्रिलर धाटणीच्या या प्रेक्षकांना दोन तास खिळवून ठेवणाऱ्या सिनेमात प्रसिध्द कलाकार प्रिन्स जेकब, राजदीप नाईक, रोहित खांडेकर यांच्यासह विविध गोमंतकीय कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत.
मधल्या काळात राज्यभरात ठिकठिकाणी या सिनेमाचे विशेष प्रदर्शित झाले त्याला गोंयकारानी चांगला प्रतिसाद दिला, मात्र गोव्याबाहेर या सिनेमाचे विशेष प्रदर्शन झाले नव्हते. आणि कोणत्याही ओटीटी प्लॅटफॉर्मवर अद्याप कोंकणी सिनेमांचे प्रदर्शन होत नसल्यामुळे ओटीटीच्या प्रेक्षकांपासून हा सिनेमा दूरच राहिला होता.
दरम्यान, या सिनेमातील प्रमुख कलाकार आणि युवा उद्योजक रोहित खांडेकर आणि विनय भट सोबत सिनेलाइफ या नावाने खास कोकणी सिनेमासाठी ओटीटी सेवेची सुरुवात केली. आणि डिकॉस्टा हाऊस ह्या त्याच्याच कोंकणी सिनेमाची निवड उद्घाटनाचा सिनेमा म्हणून केला. त्याचे हे दोन्ही प्रयोग एकाचवेळी मोठ्या प्रमाणात यशस्वी होत गेल्या पंधरा दिवसांपासून सिनेलाइफ वर मोठ्या प्रमाणात गोव्यातून आणि गोव्यात बाहेरून कोंकणी सिनेमे पाहण्यासाठी प्रेक्षकांनी लगबग केलेली दिसते.
कोंकणीमध्ये खूप चांगल्या प्रकारचे सिनेमे सुरुवातीपासूनच तयार होत आहेत. मात्र या सिनेमांचे योग्य वितरण न झाल्यामुळे त्याचे नुकसान निर्माते, दिग्दर्शक आणि कलाकारांना वेगवेगळ्या प्रकारे सहन करावे लागते. या सगळ्याचा विचार करत आम्ही सिनेलाईफची संकल्पना मांडली आणि ती प्रत्यक्षात आणली. या ओटीटीवरून आम्ही प्रदर्शित केलेल्या डिकॉस्टा हाऊस या पहिल्या सिनेमाला एवढा मोठा प्रतिसाद मिळतो आहे, ही आनंदाची बाब आहे. या प्लॅटफॉर्मवर आम्ही लवकरच अन्य कोकणी सिनेमांचेही प्रदर्शन करणार आहोत प्रेक्षकांनी त्याचा आहे आस्वाद घ्यावा, असे आवाहन सिनेलाईफच्यावतीने रोहित खांडेकर आणि विनय भट यांनी केले आहे.
…