google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
अर्थमत/ टेक्नॉलॉजीदेश/जग

विमानात आता ‘Adults Only’ झोन…

गेल्या काही वर्षांमध्ये विमानातून प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. त्या प्रमाणात विमान प्रवासी वाहतूक व्यवसायही वेगाने वाढला आहे. त्यामुळे विमान कंपन्या प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या क्लृप्त्या शोधून काढत असतात. मग ती विंडो सीट बुकिंगची कल्पना असो, विमानात वेगवेगळ्या प्रकारचे अन्नपदार्थ देणं असो किंवा आता विमानात इंटरनेट सुविधा देण्याचा मुद्दा असो. युरोपियन विमान कंपनी कोरेंडन एअरलाईन्सनं आता अशीच एक भन्नाट कल्पना शोधून काढली आहे.

कोरेंडनच्या अॅमस्टरडॅम ते कुरॅकाओ यादरम्यान प्रवासी वाहतूक सेवा देणाऱ्या विमानात कंपनीकडून ‘Adults Only’ अर्थात ‘फक्त प्रौढांसाठी’ असा एक विभाग असणार आहे. म्हणजेच, आत्तापर्यंत आपण इकोनॉमी क्लास व बिझनेस क्लास हे दोनच वर्ग विमानाच्या बाबतीत पाहिले किंवा ऐकले असतील. मात्र, या मार्गावरील या एअरलाईन्सच्या विमानात फक्त प्रौढांसाठी असा वेगळा तिसरा वर्गही असणार आहे! इंडिया टुडेनं असोसिएटेड प्रेसच्या हवाल्याने हे वृत्त दिलं आहे.

adults-only-zone-on-an-european-airlines

इंडिया टुडेनं दिलेल्या वृत्तानुसार, गेल्याच आठवड्यात विमान कंपनीनं यासंदर्भातली घोषणा केली आहे. यानुसार, विमानातील ९३ नियमित सीट्स व ९ अतिरिक्त लेगरूम (पायाजवळची मोकळी जागा) असणाऱ्या सीट्स या ओन्ली अडल्ट झोनसाठी राखीव ठेवण्यात येणार आहेत. कंपनीच्या Airbus A350 जेटमध्ये हा विभाग तयार करण्यात आला आहे. या विमानातील एकूण खुर्च्यांची संख्या ४३२ इतकी आहे. नियमित वर्ग व प्रौढांसाठीचा वर्ग यांच्यात एक पडदा किंवा पार्टिशन असेल.

दरम्यान, या विभागातील तिकिटांसाठी प्रवाशांना जादाचे पैसे भरावे लागणार आहेत. सामान्य तिकिटांसाठी अतिरिक्त ४९ अमेरिकन डॉलर्स तर जादा लेगरूम असणाऱ्या सीट्ससाठी १०९ डॉलर्स इतकी रक्कम आकारण्यात येणार आहे. येत्या नोव्हेंबर महिन्यापासून ही सुविधा सुरू केली जाणार आहे.

दरम्यान, फक्त प्रौढांसाठी असा स्वतंत्र विभाग तयार करण्यामागचं कारणही विमान कंपनीकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. अॅमस्टरडॅम ते कुरॅकाओ यादरम्यानचा प्रवास जवळपास १० तासांचा आहे. अनेक कुटुंबेही विमानाने प्रवास करत असतात. त्यामध्ये अनेकदा लहान मुलांचाही समावेश असतो. अशा लांबच्या प्रवासामध्ये मुलांना कंटाळा आल्यामुळे त्यांचा आवाज, गोंधळ किंवा लहान मूल असेल तर त्याच्या रडण्याचा आवाज याचा इतर प्रवाशांना त्रास सहन करावा लागू शकतो. याचसाठी कंपनीनं फक्त प्रौढांसाठी असा वेगळा वर्ग विमानात तयार केला आहे.

फक्त प्रौढांसाठी असणाऱ्या विभागात १६ वर्षांखालील प्रवाशांना प्रवेश नसेल. त्यावरच्याच प्रवाशांना या वर्गाची तिकिटे आरक्षित करता येतील. त्यामुळे मुलांच्या आवाजाचा त्रास कमी करण्यासाठी या वर्गातून प्रवाशांना प्रवास करता येईल. तसेच, मुलांना सोबत घेऊन प्रवास करणाऱ्या प्रवाशांना त्यांच्या गोंधळाचा इतर प्रवाशांना त्रास होतोय याची जाणीव होऊन खजीलही वाटणार नाही, असं कंपनीकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!