अंधेरी पोटनिवडणूकीतून भाजपची माघार
मुंबई:
राज्याच्या राजकारणात सध्या सर्वाधिक चर्चा सुरू असलेल्या अंधेरी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कालपासून जोरदार राजकीय घडामोडी सुरू होत्या. मनसे अध्यक्ष राज ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ही निवडणूक बिनविरोध व्हावी, असं म्हटलं होतं. त्यांनंतर आज सकाळपासूनच भाजपाच्या गोटात वेगवान हालचाली सुरु असल्याचे दिसून येत होते. त्यावरून भाजपा आपला उमेदवार मागे घेणार असल्याचं निश्चित मानलं जात होतं.
अखेर भाजपाने या निवडणुकीतून माघार घेत असल्याचे जाहीर केले. मुरजी पटेल हे आता उमेदवारी अर्ज मागे घेणार आहेत. त्यामुळे शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या उमेदवार ऋतुजा लटके यांचा बिनविरोध निवडून येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. भाजपाच्या या निर्णयानंतर ऋतुजा लटके यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे.
ऋतुजा लटके म्हणाल्या, “मी सर्वप्रथम सर्वांचे आभार मानते. सर्व पक्षातील जे वरिष्ठ नेते आहेत. त्यांच्याकडून जी पत्र गेली. त्यांनी जी माझे पती रमेश लटके यांच्या कामाबद्दल आणि त्यांचं प्रत्येकाशी असलेलं सहकार्याचं नातं. प्रत्येकजण म्हणत होतं की माझे सहकारी होते. माझ्या बरोबर होते. त्या कामाची पावती आणि त्यांच्याबरोबर असलेल्या संबंधामुळे आज मला हा सगळ्यांचा आशीर्वाद मिळालेला आहे. त्यामुळे प्रत्येकाचे मी आभार मानते.”
ठाकरे गटासाठी हा मोठा दिलासा आहे. या निवडणुकीवरुन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) विरुद्ध भाजपा असा संघर्ष सुरु असतानाच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लिहिलेल्या पत्रामुळे वळण मिळालं. त्यानंतर वेगाने घडामोडी सुरु झाल्या आणि अखेर ही निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय झाला.