‘Gen Beta’ ही पिढी-जनरेशन २०२५ ते २०३९ या कालखंडात जन्माला येणार आहे. इतकंच नाही तर २०३५ पर्यंत ही पिढी जागतिक लोकसंख्येच्या १६% भाग असेल. त्यांचे पालक जनरेशन Y (मिलेनियल्स) आणि जनरेशन Z या पिढीतील असतील. तर या नव्या येऊ घातलेल्या पिढीतील अनेक जण २२ वं शतक अनुभवतील. त्याच पार्श्वभूमीवर पिढ्यांच्या वर्गीकरणाची संकल्पना कशी अस्तित्त्वात आली याचा घेतलेला हा आढावा.
पिढ्यांचे वर्गीकरण ही एक समाजशास्त्रीय संकल्पना आहे. या संकल्पनेत विशिष्ट कालावधीत जन्मलेल्या लोकांना त्यांचे सामूहिक अनुभव, मूल्ये आणि सांस्कृतिक प्रभावांच्या आधारावर गटबद्ध केले जाते. या वर्गीकरणाचा उपयोग समाजशास्त्र, विपणन आणि सांस्कृतिक अभ्यासांमध्ये वयोगटांच्या गतीशास्त्राला समजून घेण्यासाठी केला जातो. आधुनिक पिढ्यांच्या विश्लेषणाची सुरुवात २० व्या शतकात झाली. ज्यावर समाजशास्त्रज्ञ आणि तत्त्वज्ञांच्या संशोधनाचा प्रभाव होता. या संकल्पनेची पायाभूत मांडणी विशिष्ट कालावधीत जन्मलेले लोक त्यांची मूल्ये, दृष्टिकोन आणि वर्तनावर प्रभाव टाकणाऱ्या महत्त्वाच्या सामाजिक, राजकीय आणि आर्थिक घटनांचा एकत्र अनुभव घेतात या विचारावर आधारित आहे.
पिढ्यांच्या अभ्यासाचा सैद्धांतिक पाया जर्मन समाजशास्त्रज्ञ कार्ल मॅनहाइम यांनी १९२८ साली प्रसिद्ध झालेल्या शोधनिबंधात- ‘द प्रॉब्लेम ऑफ जनरेशन्स’ मध्ये मांडला आहे. मॅनहाइम यांनी ‘पिढीची जाणीव’ (generational consciousness) ही संकल्पना मांडली आहे. समान वयोगटातील व्यक्ती त्यांच्या आयुष्यातील प्रारंभिक काळात सामूहिकपणे अनुभवलेल्या ऐतिहासिक घटनांमुळे कसे घडतात यावर भर दिला आहे. मॅनहाइम यांनी म्हटले आहे की, ‘पिढी’ म्हणजे केवळ वयोगट नाही. ती समान सामाजिक आणि ऐतिहासिक संदर्भांनी घडत गेलेली एक गटश्रेणी असते. युद्ध, क्रांती किंवा तांत्रिक प्रगती यांसारख्या प्रमुख घटना पिढीची ओळख तयार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. समाजशास्त्रज्ञ कार्ल मॅनहाइम यांनी पिढ्यांमधील भिन्नता आणि समाजावर होणाऱ्या त्यांच्या परिणामांचे आकलन करण्यासाठी समाजशास्त्रीय दृष्टिकोन प्रदान केला.
पिढ्यांचे वर्गीकरण करण्यासाठी सर्वात प्रभावी आधुनिक चौकट विल्यम स्ट्रॉस आणि नील हाऊ यांच्याकडून आली. त्यांच्या १९९१ च्या ‘Generations: The History of America’s Future, 1584 to 2069’ या पुस्तकाने पिढ्यांमधील बदलांचा आवर्त सिद्धांत (cyclical theory) मांडला. स्ट्रॉस आणि हाऊ यांनी असा युक्तिवाद केला आहे की, प्रत्येक जनरेशनच्या पॅटर्नची आवर्त स्वरूपात पुनरावृत्ती होते आणि प्रत्येक आवर्तात चार पिढ्यांचे आदर्श नमुने (archetypes) असतात. हे आदर्श साधारणतः ८०–१०० वर्षांच्या कालावधीत पुनरावृत्त पद्धतीने येतात. ही पुनरावृत्ती प्रमुख ऐतिहासिक बदलाशी संबंधित असते.
प्यू रिसर्च सेंटरसारख्या संस्थांनी पिढ्यांच्या वर्गीकरणाला अधिक स्पष्ट केले. त्यांनी या वर्गीकरणाला ठराविक जन्मवर्ष आणि सांस्कृतिक वैशिष्ट्यांशी जोडले. या वर्गीकरणांचा उपयोग समाजशास्त्र, मार्केटिंग, आणि धोरण ठरवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर केला जातो.
बेबी बूमर्स: १९४६-१९६४ दरम्यान जन्मलेले, महायुद्धानंतरचा कालखंड.
जनरेशन X: १९६५-१९८० दरम्यान जन्मलेले, आर्थिक आणि सामाजिक अस्मितेचे स्वावलंबन करणारे आणि सहनशील.
जनरेशन Y (मिलेनियल्स): १९८१-१९९६ दरम्यान जन्मलेले, तंत्रज्ञान आणि इंटरनेटशी जोडलेले.
जनरेशन Z: १९९७-२०१२ दरम्यान जन्मलेले, डिजिटल तंत्रज्ञान आणि सामाजिक सक्रियतेने प्रभावी.
जनरेशन Alpha: २०१३-२०२५ दरम्यान जन्मलेले, ही पिढी डिजिटल तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), आणि ऑटोमेशनच्या अगदी लहान वयातील परिचयासाठी ओळखली जाते.
हे वर्गीकरण लोकसंख्येच्या अभ्यासावर आधारित आहे आणि वेगवेगळ्या पिढ्यांना वेगळे करणाऱ्या सांस्कृतिक आणि तांत्रिक बदलांवर लक्ष केंद्रित करते.