google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
अर्थमत/ टेक्नॉलॉजी

‘का’ हलवला १७ हजार कोटींचा हिरा व्यापार मुंबईतून सुरतला..?

मुंबई:

सूरतच्या हिरे व्यापाऱ्यांनी अंदाजे ३४०० कोटी रुपये खर्च करून जगातील सर्वात मोठे हिरे व्यवसाय केंद्र गुजरातमध्ये तयार केले आहे. सूरत डायमंड बुर्स (Surat Diamond Bourse) नावाच्या या डायमंड हबला जगातील सर्वात मोठ्या इमारतीचा खिताबसुद्धा बहाल करण्यात आला आहे, जो आतापर्यंत अमेरिकेतील पेंटागॉन इमारतीकडे होता.

इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, गुजरातमध्ये बांधलेल्या सूरत डायमंड बुर्समुळे मुंबई आणि महाराष्ट्र सरकारला कराच्या रूपात मोठा धक्का बसणार आहे, कारण मुंबईत स्थायिक झालेल्या गुजराती हिरे व्यापाऱ्यांनी आपला व्यवसाय बंद करून सूरतच्या दिशेने स्थलांतर करण्यास सुरुवात केली आहे.


वर्षानुवर्षे सूरत शहराला डायमंड सिटी म्हटले जाते. सूरत शहरातील हिरे कारखान्यांमध्ये बनवलेले हिरे देशातील आणि जगातील विविध देशांमध्ये निर्यात केले जातात. या हिऱ्यांचा व्यवसाय लाखो लोकांना रोजगार देतो. सूरतच्या हिरे कारखान्यांमध्ये तयार करण्यात आलेले हिरे जगातील विविध देशांमध्ये पाठवण्यासाठी मुंबईचा वापर केला जातो. मुंबईत आंतरराष्ट्रीय विमानतळ असल्यामुळे सूरतच्या हिरे व्यापाऱ्यांना मुंबईत स्वतंत्र कार्यालय सुरू करावे लागले. ज्याद्वारे सूरतमध्ये तयार केलेले हिरे मुंबईतून जगातील विविध देशांमध्ये निर्यात केले जात होते.

परंतु आता असे होणार नाही, कारण सूरत डायमंड बुर्स ही जगातील सर्वात मोठी डायमंड हब इमारत गुजरातमधील सूरत येथे बांधण्यात आली आहे, ज्यामध्ये सूरतच्या हिरे व्यापाऱ्यांना आवश्यक असलेल्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यामुळेच आता मुंबईतून जगभरात हिऱ्यांचा व्यवसाय करणारे सूरतचे हिरे व्यापारी मुंबईतून आपला हिरे व्यवसाय बंद करून सूरतला स्थलांतरित होत आहेत. सूरत डायमंड असोसिएशनचे माजी अध्यक्ष आणि सूरत डायमंड बुर्सचे समिती सदस्य दिनेश भाई नावडिया यांनी सांगितले की, सरकारने जाहीर केलेल्या ड्रीम सिटी प्रकल्पाच्या अंतर्गत खजोद परिसरात प्रत्येकी १४ मजल्यांचे ९ टॉवर्स बनवण्यात आले असून, ते ६७ लाख चौरस फूट जागेवर बांधण्यात आले आहेत. या टॉवर्समध्ये विविध हिरे कंपन्यांची ४३०० कार्यालये आहेत. इमारती तयार होण्यापूर्वीच ही कार्यालये हिरे व्यापाऱ्यांनी विकत घेतली होती. हा सूरत डायमंड बोर्स अंदाजे ३४०० कोटी रुपये खर्चून तयार करण्यात आला आहे. सूरत आणि मुंबईतील हिरे व्यापाऱ्यांना एकाच छताखाली आणता यावे, यासाठी हिरे व्यापाऱ्यांनी बाजारभावापेक्षा जास्त पैसे देऊन सरकारकडून येथे जमिनी खरेदी केल्या होत्या.


दिनेश भाई म्हणाले की, आतापर्यंत जगातील विविध देशांमध्ये हिरे पाठवण्यासाठी सूरतच्या व्यावसायिकांना मुंबईत स्वतंत्र कार्यालयीन कर्मचारी ठेवावे लागत होते, कार्यालय उघडावे लागत होते आणि आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे त्यांना मुंबईतूनच व्यवसाय करावा लागत होता. पण आता सूरत डायमंड बुर्समध्ये हिरे व्यापाऱ्याला आवश्यक असलेल्या सर्व सुविधा उपलब्ध आहेत. जगातील सर्वात मोठे कस्टम हाऊस तयार आहे. आता सूरत विमानतळावरून आंतरराष्ट्रीय उड्डाणेही सुरू होणार असून, त्यामुळे सूरतचे हिरे व्यापारी आता मुंबईऐवजी सूरतमधून जगभरातील हिऱ्यांचा व्यवसाय करू शकतील.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!