
श्रीलंका, पाकिस्ताननंतर आता ‘या’ देशाच्या अर्थव्यवस्थेला ग्रहण
नवी दिल्ली:
श्रीलंका, मालदीव, नेपाळ, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानची अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे. हे सर्व भारताच्या शेजारील देशांतील आहेत. इराणची अर्थव्यवस्थाही डळमळीत झालेली दिसत आहे. मूलभूत वस्तूंच्या किमतींनी विक्रमी उच्चांक गाठला आहे.
दरम्यान, इराणचे (Iran) सामाजिक व्यवहार मंत्री होज्जतुल्लाह अब्दुलमलकी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. इराणची ढासळती आर्थिक परिस्थिती पाहता होज्जतुल्ला यांना राजीनामा द्यावा लागल्याचे अहवालात म्हटले आहे.
इराणमध्ये महागाईचा (Inflation) दर झपाट्याने वाढत असून इब्राहिम रायसी सरकारवर दबाव वाढू लागला आहे. गेल्या काही दिवसांपासून अनेक पेन्शनधारक होज्जतुल्ला यांच्या राजीनाम्याची मागणी करत होते. इराण आण्विक करार आणि अमेरिकेच्या (America) निर्बंधांवरील मंदीच्या दरम्यान इराली रियालच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे. इराणच्या मीडिया रिपोर्ट्सनुसार, होज्जतुल्लांहच्या राजीनाम्यानंतर इब्राहिम सरकारच्या अडचणी वाढू शकतात. सरकारने मोहम्मद हादी जाहेदी वफा यांची काळजीवाहू मंत्री म्हणून नियुक्ती केली आहे.