डॉ एल मुरुगन यांच्या हस्ते ‘मास्टरक्लासेस’चे उद्घाटन
केंद्रीय माहिती आणि प्रसारण तसेच संसदीय व्यवहार मंत्री डॉ.एल. मुरुगन यांनी गोव्यातील कला अकादमी येथे आज 56 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील (इफ्फी 2025) मास्टरक्लासेसचे उद्घाटन केले. केंद्रीय माहिती आणि प्रसारण विभाग सचिव संजय जाजू, केंद्रीय माहिती आणि प्रसारण विभागाचे संयुक्त सचिव डॉ.अजय नागभूषण; राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश मगदूम, सुप्रसिध्द चित्रपट निर्माते मुझफ्फर अली; तसेच चित्रपट क्षेत्रातील प्रख्यात व्यक्तिमत्व असलेले रवी कोट्टरकारा हे या कार्यक्रमाला उपस्थित होते.
एक ऐतिहासिक टप्पा गाठत या वर्षीच्या मास्टरक्लासचे उद्घाटन पहिल्यांदाच सामान्य जनतेच्या उपस्थितीत झाल्यामुळे सुलभ उपलब्धता आणि व्यापक सहभाग यांच्या प्रती या महोत्सवाच्या बांधिलकीचे दर्शन घडले.
चित्रपटीय सहयोग आणि प्रतिभेची देवाणघेवाण करण्यासाठीचे जागतिक व्यासपीठ म्हणून या मास्टरक्लासेसची भूमिका आणखी बळकट करत यावर्षी ऑस्ट्रेलिया, जपान, जर्मनी आणि कॅनडा या देशांतील सहभागी मास्टरक्लासेसमध्ये सहभागी होण्यासाठी आले आहेत
जगभरात भारताच्या वाढत्या चित्रपटीय प्रभावाचे प्रतिनिधित्व करत यावेळी इफ्फी 2025 मध्ये 200 पेक्षा जास्त चित्रपट सादर होणार आहेत ही बाब केंद्रीय मंत्री लोकनाथन मुरुगन यांनी आपल्या उद्घाटनपर भाषणात अधोरेखित केली. ते पुढे म्हणाले की, विकसित भारत घडवण्याच्या दिशेने देशाच्या वाटचालीला अनुकूल असेल अशा रीतीने हा महोत्सव आयोजित करण्यात आला असून भारताची सर्जनशील पदचिन्हे विस्तारण्याच्या भारताच्या महत्त्वाकांक्षेला त्यातून दुजोरा मिळतो. यावर्षी महिलांनी दिग्दर्शित केलेले 50 चित्रपट या महोत्सवात सादर होणार आहेत याची दखल घेत केंद्रीय मंत्र्यांनी महिला चित्रपट निर्मात्यांचा सहभाग आणि योगदान अधोरेखित केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीकडून मिळालेल्या प्रेरणेसह स्त्री शक्ती आणि महिला सक्षमीकरण यांच्याप्रती सरकारच्या बांधिलकीचे यातून दर्शन घडते.
इफ्फी 2025 मधील मास्टरक्लासेसमध्ये गट चर्चा, कार्यशाळा, गोलमेज संवाद, मुलाखतींची सत्रे, फायरसाईड गप्पा आणि संवादात्मक कार्यशाळा यांच्यासह ज्ञानाच्या सामायीकीकरणाच्या विविध स्वरूपाची विस्तृत श्रेणी आयोजित करण्यात आली आहे. विधू विनोद चोप्रा, अनुपम खेर. मुझफ्फर अली, नौशाद अली, शेखर कपूर, राजकुमार हिरानी. आमीर खान, विशाल भारद्वाज आणि सुहासिनी मणिरत्नम यांसारख्या चित्रपटसृष्टीतील मान्यवर व्यक्ती या महोत्सवात विविध सत्रे घेणार आहेत.
सुप्रसिध्द चित्रपटनिर्माते मुझफ्फर अली यांनी मास्टरक्लासेसच्या पहिल्या सत्राचे नेतृत्व करून येणाऱ्या सत्रांसाठी सूर निश्चित करून दिला.
या वर्षीच्या मास्टरक्लासेस मध्ये समकालीन तसेच भविष्य-वेधी संकल्पनांचा देखील शोध घेण्यात येणार आहे. यासाठी या महोत्सवाच्या काळात कृत्रिम बुद्धीमत्ता, शाश्वतता यांच्यावर आधारलेली विशेष सत्रे तसेच सिनेमॅटोग्राफी, व्हीएफएक्स आणि एसएफएक्स यांच्यावर अधिक लक्ष केंद्रित करणाऱ्या तांत्रिक कार्यशाळा आयोजित करण्यात आल्या आहेत. त्याबरोबरच, चित्रपट उद्योगातील प्रमुख तज्ञांनी रंगमंचावरील अभिनय या विषयावरील मास्टरक्लासेस उपस्थितांच्या अध्ययन अनुभवाला खोली प्राप्त करून देईल.






