google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
सिनेनामा 

भव्य वालुकाशिल्पाचे मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांच्या हस्ते उद्घाटन

सुप्रसिध्द वालुकाशिल्प कलाकार आणि पद्मश्री सन्मानप्राप्त सुदर्शन पटनाईक यांनी गोवा येथे आयोजित 55 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील (इफ्फी) कार्यक्रमांचा भाग म्हणून काल मिरामार समुद्र किनाऱ्यावर थक्क करणाऱ्या वालुका कलाकृती साकारल्या. अक्किनेनी नागेश्वर राव, तपन सिन्हा, मोहम्मद रफी आणि राज कपूर या भारतीय चित्रपटसृष्टी आणि संगीत विश्वातील चार महान प्रतिभावंतांना आदरांजली म्हणून तयार केलेल्या या वालुका शिल्पांचे गोव्याचे मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांनी उद्घाटन केले.

भारतीय चित्रपट विश्वातील या चार प्रतिभावान कलावंतांचा इतक्या सृजनशील तसेच कलात्मक पद्धतीने गौरव केल्याबद्दल डॉ.प्रमोद सावंत यांनी एनएफडीसी तसेच सुदर्शन पटनाईक यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. हे वालुका शिल्प आता सामान्य जनतेला पाहण्यासाठी आणि त्याला दाद देण्यासाठी खुले आहे असे जाहीर करत डॉ.सावंत म्हणाले, “हे शिल्प मीरामारच्या समुद्रकिनाऱ्यावर उभारण्यात आलेल्या सर्वात मोठ्या वालुका शिल्पांपैकी एक असून या महान व्यक्तींच्या वारशाचा देखणा दाखलाच ठरणार आहे. या उल्लेखनीय प्रयत्नांबद्दल मी सुदर्शन पटनाईक आणि त्यांच्या संपूर्ण चमूचे अभिनंदन करतो.”

मिरामार समुद्रकिनाऱ्याच्या सुंदर पार्श्वभूमीवर उभारण्यात आलेले हे शिल्प चित्रपट क्षेत्रातील चार महान व्यक्तिमत्त्वांना त्यांच्या अमर योगदानाबद्दल आदरांजली वाहत आहे. या चौघांपैकी प्रत्येकाने भारतीय चित्रपट आणि संगीत उद्योगाला आपापल्या पद्धतीने आकार दिला आणि हे वालुका शिल्प म्हणजे त्यांच्या कालातीत प्रभावाला वाहिलेली हृदयस्पर्शी श्रद्धांजली ठरली आहे.

Miramar Beach in Goa witness the stunning sand artistry of Sudarsan Pattnaik

“ही कलाकृती साकारायला दोन पूर्ण दिवस लागले. एक दिवस तयारीला, आणि दुसरा बारीक कोरीव कामासाठी,” पटनाईक यांनी नमूद केले. वाळू शिल्पकलेमधील अमूल्य योगदानासाठी जगभर ओळख मिळवणारे सुदर्शन पटनाईक, आपल्या कलेच्या माध्यमातून विविध सामाजिक आणि पर्यावरण विषयक समस्यांवर जागरुकता निर्माण करणे, आणि आपल्या कामातून शांतता, सौहार्द आणि एकतेचा पुरस्कार करणे, यासाठी ओळखले जातात.

“मी यापूर्वी कान चित्रपट महोत्सवात माझे वालुका शिल्प सादर केले आहे, मात्र इफ्फी (IFFI) महोत्सवात आमंत्रित होण्याची ही माझी पहिलीच वेळ आहे,” ते म्हणाले.

वालुका शिल्प कलेचे महत्व सांगताना, सुदर्शन पटनाईक यांनी गोव्यामध्ये वालुका शिल्प कला प्रशिक्षणाचे केंद्र बनण्याची क्षमता असल्याचे सांगितले. “सुंदर समुद्र किनार्‍यांनी नटलेल्या गोव्यामध्ये वालुका शिल्प कलेसाठी समर्पित प्रशिक्षण संस्था असायला हवी, ज्या ठिकाणी स्थानिक कलाकार आणि विद्यार्थी वाळू शिल्पकलेमधील बारकावे शिकतील. गोव्याच्या सांस्कृतिक परीप्रेक्षात ते भर घालणारे असेल, आणि जगभरातून गोव्याला भेट देणाऱ्या पर्यटकांना आकर्षित करण्याचा तो एक उत्तम मार्ग असेल,” ते म्हणाले.

गोवा आणि आपले मूळ राज्य, ओदिशा येथील आगळ्या किनारपट्टी प्रदेशाबद्दल बोलताना, पटनाईक यांनी वेगवेगळ्या ठिकाणच्या समुद्र किनार्‍यांवर आढळणाऱ्या विविध प्रकारच्या वाळूबद्दल आपले विचार मांडले. “प्रत्येक समुद्रकिनाऱ्याचे स्वतःचे वैशिष्ट्य असते आणि तिथल्या वाळूचा वेगळा प्रकार असतो, पण कलाकारासाठी मात्र प्रत्येक वाळू सारखीच असते,” ते म्हणाले.

पटनाईक यांच्या कामाने त्यांना जगभर प्रशंसा मिळवून दिली आहे. प्रतिष्ठेच्या कान चित्रपट महोत्सवासह, अनेक आंतरराष्ट्रीय वाळू शिल्प कला महोत्सवांमध्ये त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. इफ्फी (IFFI) महोत्सवातील त्यांचे सादरीकरण, हे केवळ भारतीय सिने सृष्टीतील दिग्गज व्यक्तींना दिलेली आदरांजली नसून, कला आणि सिनेमाचा संगम साधत, महोत्सवाच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेत उल्लेखनीय भर घालणारे आहे.

सुदर्शन पटनाईक यांनी मिरामार बीचवर साकारलेले वाळूचे शिल्प आता लोकांसाठी खुले आहे. इफ्फी महोत्सवात सहभागी झालेल्यांना आणि स्थानिक नागरिकांना या ठिकाणी भेट देऊन ही असामान्य कलाकृती पाहता येईल आणि या कलाकृतीची प्रशंसा करता येईल.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!