google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
देश/जग

‘का’ झाली अमेरिकेची विमान सेवा ठप्प?

अमेरिकेची विमान सेवा अचानक ठप्प झाली आहे. विमानतळ आणि एअर ट्राफिक कंट्रोल रुमच्या संगणकात अचानक तांत्रिक बिघाड झाल्यामुळे संपूर्ण देशातील विमान सेवा ठप्प झाली आहे. पुढचे आदेश येईपर्यंत विमानांचे उड्डाण रद्द करण्यात आले आहेत. फेडरल एव्हिएशन ॲडमिनिस्ट्रेशनच्या (FAA) संगणकात तांत्रिक बिघाड झाल्यानंतर विमानसेवा प्रभावित झाल्याचे सांगण्यात येत आहे. न्यूयॉर्क टाइम्सच्या माहितीनुसार आतापर्यंत २५१२ विमानांना उड्डाण घेण्यास उशीर झाला आहे. तर २५४ डोमेस्टिक विमाने रद्द करण्यात आली आहेत. राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले असून सखोल चौकशी करण्याचे आदेश व्हाइट हाऊसकडून देण्यात आले आहेत.

फेडरल एव्हिएशन ॲडमिनिस्ट्रेशनच्या (FAA) ने दिलेल्या माहितीनुसार, NOTAM (नोटीस टू एअर मिशन्स) सिस्टिम ठप्प झाली आहे. नेमका बिघाड कशात झाला याची माहिती मिळाल्यानंतर पुन्हा एकदा फ्लाइट ऑपरेशन्स रिस्टोर करण्याचा प्रयत्न केला जाईल. NOTAM हा विमानांच्या उड्डाणाच्या बाबतीत काम करणारी महत्त्वाची प्रणाली आहे. याच्याआधारेच विमानांना टेक ऑफ आणि लँडिंगची माहिती मिळत असते. NOTAM मधून रिअल टाईम डेटा गोळा करुन विमानतळ ऑपरेशन्स आणि एअर ट्राफिक कंट्रोलला (ATC) अचूक माहिती पुरविली जाते. त्यानंतर एटीसी त्याला पायलट्सपर्यंत पोहोचवते.

अमेरिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढा मोठा तांत्रिक बिघाड झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे व्हाइट हाऊसकडून देखील यावर प्रतिक्रिया देण्यात आली आहे. जनसंपर्क सचिव कैरीन जीन पियरे यांनी सांगितले की, दळणवळण विभागाचे सचिव काही वेळापूर्वीच राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांना भेटले आहेत. अचानक उद्भवलेल्या या संकटाबाबत त्यांनी अध्यक्षांना अवगत केलं आहे. आतापर्यंत जो काही तपास झाला त्यावरुन हा सायबर हल्ला नसल्याचे आमच्या लक्षात आले आहे. मात्र राष्ट्राध्यक्ष बायडन या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहत असून खोलात जाऊन याची चौकशी करण्याचे आदेश दिले गेले आहेत.

विमानांचे उड्डाण अचानक रद्द झाल्यानंतर देशभरातील विविध विमानतळांवर हजारो प्रवाशी अडकून पडले आहेत. भारतीय विमान सेवेवर याचा अद्याप परिणाम झालेला दिसून आलेला नाही. डीजीसीएच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार भारतातील सर्व विमानतळांवर सुरळीत काम सुरु आहे. भारतातून अमेरिकेत जाणाऱ्या विमानामध्ये अद्याप कोणताही अटकाव करण्यात आलेला नाही.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!