‘सभापती महाशय! काणकोणकर तुमच्या पापाचे वाटेकरी होणार नाहीत’
काणकोण :
काणकोणकर हे जबाबदारी आणि उत्तरदायित्वासाठी ओळखले जातात. कृपया आम्हाला लाज वाटेल असे काहीच करु नका. आम्ही आशा करतो की तुम्ही दोन दिवसांच्या आमदारांच्या प्रशिक्षण सत्रात कोणतीही लबाडी केली नसेल. पारदर्शक व्हा आणि दोन दिवसींय आमदार प्रशिक्षण शिबीराचा सर्व तपशील सार्वजनिक करा. दूध का दूध, पानी का पानी हो जाये असा जबरदस्त टोला काँग्रेसचे सरचिटणीस जनार्दन भंडारी यांनी हाणला आहे.
गोवा विधानसभा सचिवालयाने तारांकीत प्रश्न तसेच माहिती हक्क कायद्याखाली केलेल्या अर्जावर माहिती देण्यास नकार दिल्याच्या वृत्तावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करताना जनार्दन भंडारी यांनी सभापती आणि काणकोणच्या आमदारांना या प्रकरणी स्पष्टीकरण देण्याचे आवाहन केले आहे.
गोवा विधानसभेचे अध्यक्ष रमेश तवडकर यांना काणकोणकरांनी निवडून दिले आहे हे त्यांनी लक्षात ठेवावे आणि काणकोणकरांना लाज वाटेल असे कोणतेही कृत्य करू नये. सदर प्रशिक्षण शिबीराचे सर्व सोपस्कार योग्य पद्धतीने केले असतील तर सभापती रमेश तवडकरांना काळजी करण्यासारखे काही नाही. लोकांना खरी वस्तुस्थिती आणि आकडेवारी कळू द्या, असे जनार्दन भंडारी म्हणाले.
पंचतारांकित हॉटेलमध्ये आयोजित आमदारांच्या दोन दिवसीय प्रशिक्षण सत्राचा सर्व तपशील मागवणाऱ्या कुंकळ्ळीचे आमदार युरी आलेमाव यांच्या विधानसभेतील तारांकीत प्रश्नाला उत्तर देण्यास गोवा विधानसभा सचिवालयाने प्रथम “नकार” दिला. त्यानंतर, अॅड. आयरीश रोड्रीगीस यांनी दाखल केलेल्या आरटीआय अर्जाला उत्तर देण्यासही नकार दिला जातो हे धक्कादायक आहे. सभापती माहिती लपवुन का ठेवतात? असा सवाल जनार्दन भंडारी यांनी केला आहे.
मी पुन्हा एकदा सभापती आणि काणकोणचे आमदार रमेश तवडकर यांना विनंती करतो की त्यांनी सर्व माहिती सार्वजनिक करण्यासाठी गोवा विधानसभा विभागाच्या माहिती अधिकार्यांना तातडीने निर्देश द्यावेत. सभापतींनी तसे न केल्यास ‘दाल मे कुछ काला है’ हे उघड होईल, असे जनार्दन भंडारी म्हणाले.