पणजी :
केंद्र सरकारचे सामाजिक न्याय आणि सशक्तिकरण मंत्रालय व गोवा राज्याचे समाज कल्याण संचालनालय संयुक्तरीत्या प्रस्तुत ज्योती कुंकळकर यांच्या ‘काळखी वाट’ या कोकणी चित्रपटाचा प्रीमियर शो जागतिक ड्रग्सविरोधी दिनाचे औचित्य साधून २६ जून रोजी सायंकाळी ४ वाजता मॅकेनिज पॅलेसच्या मल्टीपर्पज हॉलमध्ये होणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत उपस्थित राहाणार आहेत.
या चित्रपटाच्या प्रीमियरला सन्माननीय अतिथी म्हणून समाज कल्याण मंत्री सुभाष फळदेसाई उपस्थित राहाणार आहेत. त्याशिवाय समाज कल्याण खात्याचे संचालक अजीत पंचवाडकर आणि सचिव ई.वल्लवन (आयएएस) यांचीही विशेष उपस्थिती असेल.
ड्रग्सचा समाजाला पडलेला विळखा एका कौटुंबिक कथानकाच्या माध्यमातून यात मांडण्यात आलेला आहे. भारत हा तरुणांचा देश आहे आणि त्यांच्याकडे अचाट प्रतिभा आहे. त्याला योग्य वाट मिळण्याची गरज आहे. मात्र ड्रग्स नावाचा राक्षास समाजाला पोखरतो आहे. या व्यसनातून बाहेर पडल्यास युवक अनेक चांगली कामे करू शकतात, हा संदेश या चित्रपटातून देण्याचा प्रयत्न आहे.
पौगंडावस्था ते युवावस्था हा स्वत:विषयी आणि सामाजिक भान येण्याचा काळ. याच काळात शाळा, कॉलेजमध्ये असे चित्रपट दाखवले गेल्यास त्याचा योग्य तो परिणाम होऊ शकेल.
गोव्यात सामाजिक चित्रपट करण्याची एक वेगळी पार्श्वभूमी असलेल्या एक संवेदनशील साहित्यिक ज्योती कुंकळकर यांनी या चित्रपटाचे कथा- पटकथा- संवाद लिहिले आहेत. यापूर्वीही त्यांनी मरेपर्यंत फाशीसारखे वेगळे चित्रपट केले आहेत.
या चित्रपटात गोव्यातील आघाडीचे कलाकार रघुनाथ साकोर्डेकर, रुपा च्यारी, अजित कामत, मोहन चांदेलकर, कलानंद कामत बांबोळकर यांच्या भूमिका आहेत. तसेच मौर्य च्यारी व मेगन डिसोझा या चित्रपटातून पदार्पण करीत आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन शिरीष राणे यानी केले आहे.