– संतोष पाठारे
के.विश्वनाथ गेल्याची बातमी आली आणि मन भूतकाळात रमून गेलं. ठाण्याच्या गणेश टॉकीज मध्ये दोन वेळा पाहिलेला सरगम . डफलीवाले डफली बजा हे गाणं पडद्यावर सुरू झाल्यानंतर पब्लिकने फेकलेली नाणी. सागर संगमम मधील जयाप्रदा आणि कमल हसन यांच्यावर चित्रित झालेला भावनिक प्रसंग. शंकरा भरणम मधील अलौकिक शास्त्रीय संगीत, सुर संगम मधील धन्य भाग सेवा का अवसर पाया ही भैरवी , संजोग मधील जू जु जू ही अंगाई आणि कामचोर मधील तुमसे बढकर दुनिया मे ना देखा कोई ओर जुबापर आज दिल की बात आ गई.. चा किशोर कुमार आणि अलका याग्निकचा मधाळ आवाज.
१९५२ साली भारताच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दाखल झालेल्या पाताल भैरवी या तेलुगू सिनेमाचे सहाय्यक दिग्दर्शक म्हणून के.विश्वनाथ यांनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. साठच्या दशकात अनेक तेलुगू सिनेमाचे दिग्दर्शन करणाऱ्या के. विश्वनाथ यांनी सरगम हा पहिला हिंदी सिनेमा दिग्दर्शित केला. कमल हसन, जयाप्रदा, श्रीदेवी या दाक्षिणात्य कलाकारांना गुरू स्थानी असणाऱ्या के. विश्वनाथ यांच्या सिनेमातील प्रमुख व्यक्तिरेखा नेहमी सामान्य सामाजिक स्तरातील,सात्विक स्वभावाची, तिच्या समोर येणाऱ्या अडचणीवर मात करून तावून सुलाखून निघणारी. लोककला, अभिजात भारतीय कला यांचा पुरस्कार नेहमीच त्यांनी केला.
व्यावसायिक भान बाळगून निर्भेळ कौटुंबिक कथानक सादर केली. त्यांच्या बहुतांशी चित्रपटांची शीर्षके स या आद्याक्षरानी सुरू होणारी. स संगीताचा, सात्विकतेचा, शुचीतेचा. प्रेक्षकांना नाट्यपूर्ण कथानकात गुंतवून ठेवण्याची हातोटी लाभलेला हा ऋषितुल्य दिग्दर्शक.
त्यांच्या अतीव नम्रतेचा अनुभव २०१३ च्या बेंगळुरू चित्रपट महोत्सवात मला आला.तिथल्या समारंभात झालेल्या भेटी मध्ये मी त्यांचा चाहता असल्याचे सांगितले. तुम्ही सर्वोत्कृष्ट चित्रपट आम्हाला दिले आहेत अस मी सांगितल्यावर, मी एक साधारण कलावंत आहे ,अजून मला सर्वोत्तम कलाकृती निर्माण करायची आहे अस त्यांनी नम्रपणे सांगितलं. मी सहसा चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठांना पायाला स्पर्श करून नमस्कार करत नाही पण के. विश्वनाथ यांना मात्र वाकून नमस्कार केला.
आज त्यांच्या निधनाची बातमी आली तेव्हा त्यांची भेट आठवली. हम तो चले परदेस हम परदेसी हो गये.. के.विश्वनाथ सर, तुमच्या चित्रपटांतून तुम्ही नेहमी आमच्या सोबत असाल.