अहमदनगरचे नाव बदलणार; हे असणार नवे नाव…
अहमदनगर:
पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांचं जन्मस्थान असलेल्या अहमदनगर येथील चौंडी येथे आज आहिल्यादेवी होळकर यांच्या २९८ व्या जयंतीनिमित्त मोठ्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हजर आहेत. या कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अहमदनगर जिल्ह्याचं नाव आहिल्यादेवी होळकर नगर असं व्हावं ही इच्छा व्यक्त केली. त्यापाठोपाठ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लगेच त्यांच्या भाषणात घोषणा केली की, सर्वांची इच्छा आहे, त्यामुळे आपण अहमदनगरचं नाव बदलून आहिल्यादेवी होळकर नगर असं केलं जाणार आहे. याबाबतचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, आहिल्यादेवींचं माहेरचं आडनाव शिंदे आहे आणि मी पण शिंदेच आहे. आज येथे रामभाऊ शिंदे आणि गोपीचंद पडळकर यांनी मागणी मांडली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माझीही तीच इच्छा आहे. तसेच तुमच्या सर्वाच्या इच्छेखातर अहमदनगर जिल्ह्याचं नाव आहिल्यादेवी होळकर नगर असं करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
एकनाथ शिंदे म्हणाले, आहिल्यादेवींचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आम्ही काम करत आहोत. आज हा ऐतिहासिक सोहळ्याला मी उपस्थित आहे. देवेंद्र फडणवीस आणि मी येथे उपस्थित असल्याचा मला खूप अभिमान आहे. आहिल्यादेवींच कर्तृत्व हिमायलाएवढं आहे. त्यामुळेच या अहमदनगरला त्यांचं दिलं जाईल. हा निर्णय आमच्या सरकारच्या काळात घेतला जातोय हे आमचं भाग्य आहे.
एकनाथ शिंदे म्हणाले, मघाशी गोपीचंद भाऊंनी सांगितलं ज्यांनी इथं येऊन राजकारण करण्याचा प्रयत्न केला त्यांना म्हणजेच मागच्या सरकारला २० दिवसात घालवण्याचं काम आम्ही केलं. आहिल्या देवी सहकारी तत्वावरच्या महामंडळासाठी १०,००० कोटींची तरतूत केली आहे. आहिल्यादेवींची ३०० वी जयंती अशी होईल की, जगभरातल्या लोकांना हेवा वााटेल.