google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
देश/जगमहाराष्ट्र

‘विकास आणि वारसा दोन्ही सोबत पुढे नेण्यासाठी एकत्रित प्रयत्न हवेत’

पुणे (अभयकुमार देशमुख) :

देशात आधुनिक तंत्रज्ञान आणि पायाभूत सुविधांचा विकास होत असताना विकास आणि देशाचा वैभवशाली प्राचीन वारसा सोबत पुढे नेण्यासाठी एकत्रित प्रयत्नांची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले.

देहू येथे आयोजित जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज शिळा मंदिराच्या लोकार्पण कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, आमदार चंद्रकांत पाटील, वारकरी संप्रदायाचे मारुतीबाबा कुरेकर, जगद्गुरु संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे, तुषार भोसले आदी उपस्थित होते.

प्रधानमंत्री म्हणाले, भारतीय संस्कृती ही जगातील सर्वात प्राचीन संस्कृतीपैकी एक असल्याचा आपल्याला अभिमान आहे, याचे श्रेय भारतीय संत परंपरेला आणि ऋषी मुनींना आहे. राष्ट्रीय ऐक्य मजबूत करण्यासाठी आपली प्राचीन ओळख आणि परंपरेचे जतन करणे हे आपले कर्तव्य आहे. भारत ही संतांची भूमी असल्याने या देशाचा विचार शाश्वत आहे. प्रत्येक काळात महापुरुषांनी जन्म घेऊन आपल्या शाश्वत मूल्यांचे रक्षण केले आणि देश व समाजाला मार्गदर्शन केले. समाजातील अखेरच्या व्यक्तींचे कल्याण करावे हाच संतांचा संदेश आहे. या संदेशानुसार गरिबांचे कल्याण ही देशाची प्रथमिकता आहे.

संत भिन्न परिस्थितीत समाजाला मार्गदर्शन करतात. छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या महापुरुषांच्या जीवनात संत तुकाराम यांच्यासारख्या संतांची महत्वाची भूमिका आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर कैदेत असताना तुकाराम महाराजांचे अभंग म्हणत. संत तुकारामांची करुणा, दया आणि सेवेचा बोध त्यांच्या अभंगाच्यारुपाने आजही आपल्यात आहे. या अभंगांनी अनेक पिढ्यांना प्रेरणा दिली. आजही हे अभंग आपल्याला ऊर्जा देतात, मार्गदर्शन करतात. ऐक्यासाठी संत विचारांच्या प्राचीन परंपरेला जपावे लागेल.

प्रयत्नातून अशक्याला शक्य करता येते हे तुकाराम महाराजांनी सांगितले आहे. देशात पर्यावरण, जलसंरक्षण आणि नदी वाचविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यात सर्वांच्या सहकार्याची गरज आहे. आपल्या अध्यात्मिक परंपरेशी हे विषय जोडल्यास पर्यावरणाचे मोठे काम होईल. सेंद्रिय शेतीला प्रत्येक शेतापर्यंत पोहोचविण्यासाठी मिळून प्रयत्न करावे लागतील. योग ही भारताची जगाला देणगी आहे असे सांगून आंतरराष्ट्रीय योग दिवसात सर्वांनी सहभाग व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.


तुकाराम महाराजांनी जीवनात भूक आणि दुःख पाहिले. संकटकाळात कुटुंबाच्या संपत्तीला जनसेवेसाठी समर्पित केले. त्यांचे कार्य भविष्यासाठी आशेचा किरण आहे, तर ही शिळा त्यांच्या बोध आणि वैराग्याची साक्ष आहे. संतांच्या अभंगवाणीने अनेक पिढ्यांना प्रेरणा दिली. आज देश सांस्कृतिक मूल्यांच्या आधारे पुढे जात असताना अभंग समाजाला मार्गदर्शन करीत आहेत. मराठी संतांच्या अभंगवाणीतून नित्यनवी प्रेरणा मिळते. तुकाराम महाराजांनी माणसात भेदभाव करणे मोठे पाप म्हटले आहे. समाजासाठी हा संदेश महत्वाचा आहे असेही ते म्हणाले.

मोदी म्हणाले, संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग पाच टप्प्यात आणि आणि संत तुकाराम महाराज पालखी मार्ग तीन टप्प्यात पूर्ण होणार आहे. या दोन्ही एकूण ३५० किलोमीटरपेक्षा अधिक चौपदरी मार्गासाठी ११ हजार कोटीपेक्षा अधिक खर्च होणार आहे. या मार्गामुळे परिसरातील विकासालाही गती मिळेल. शास्त्रात म्हटले आहे मानवजन्मात संतसंग सर्वात महत्वाचा आहे, त्यांच्या सहवासात सुखाची अनुभूती असते. असा अनुभव देहूसारख्या तीर्थक्षेत्री आल्यावर मिळतो.



यावेळी विधानसभेचे विरोधी पक्षनेते श्री.फडणवीस यांनीही विचार व्यक्त केले. तुकाराम महाराजांनी समाजाला अंधश्रद्धेपासून दूर नेत अध्यात्म मार्ग दाखविला असे त्यांनी सांगितले. नितीन महाराज मोरे यांनी प्रास्ताविक केले.

प्रधानमंत्री मोदी यांच्या हस्ते संत चोखामेळा सार्थ अभंग गाथेचे विमोचन करण्यात आले. प्रधानमंत्री श्री.मोदी यांचा जगद्गुरु संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे, विठ्ठल रखुमाई मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थान आळंदीचे प्रमुख विश्वस्त योगेश देसाई यांनी तिन्ही संस्थांच्यावतीने सत्कार करण्यात आला.

तत्पूर्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते श्री संत तुकाराम महाराज शिळा मंदिराचे लोकार्पण आणि ध्वजपूजन करण्यात आले. त्यांच्या हस्ते संत तुकाराम महाराजांच्या मूर्तीला अभिषेक करण्यात आला. त्यांनी इंद्रायणी नदी, भंडारा, घोरवडेश्वर आणि भामगिरी टेकडीचे दर्शन घेतले. प्रधानमंत्री श्री.मोदी यांनी संत तुकाराम महाराज लिखित अभंगगाथेची हस्तलिखित प्रत आणि पालखीचेही दर्शन घेतले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!