मडगाव: मडगावचे सुपुत्र आणि जगप्रसिद्ध चित्रकार लक्ष्मण पै यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त मडगांवचो आवाज यांच्या वतीने रविवारी आयोजित करण्यात आलेल्या शताब्दी वर्ष समारंभात गोवा सरकारने गोवा कला महाविद्यालयाला लक्ष्मण पै यांचे नाव द्यावे तसेच गोवा विद्यापीठात ‘लक्ष्मण पै चेअर’ स्थापन करावी, अशी मागणी करण्यात आली.
इंपेरियल हॉल, डॉ. राजेंद्र प्रसाद स्टेडियम, मडगाव येथे आयोजित कार्यक्रमाला लक्ष्मण पै यांचे सुपुत्र आकाश पै व कुटुंबीय खास अमेरिकेहून गोव्याला येवून उपस्थित राहिले. गोव्यातील कलाकार, विद्यार्थी, कला रसिक आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून गोव्याच्या एका महान कलाकाराला आदरांजली वाहिली.
कार्यक्रमाला संबोधित करताना मडगांवचो आवाज व युवा नेते प्रभव नायक यांनी लक्ष्मण पै यांचे जीवन आणि कार्य हे कलात्मक उत्कृष्टता, शिस्त आणि सांस्कृतिक मुळांशी नाते जपणारे होते. गोवा कला महाविद्यालयाला त्यांचे नाव देणे आणि गोवा विद्यापीठात चेअर स्थापन करणे हे त्यांच्या वारशाचे जतन करण्यासाठी व पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल, असे सांगितले.
लक्ष्मण पै यांचे ज्येष्ठ विद्यार्थी आणि नामवंत कलाकार प्रा. महेश वेंगुर्लेकर यांच्यासह प्रा. निरुपा नाईक, श्रीधर कामत बांबोळकर, महेंद्र आल्वारीस आणि संजय हरमलकर यांनी लक्ष्मण पै यांच्या जीवनावर, कला तत्त्वज्ञान आणि सर्जनशील प्रवासावर प्रकाश टाकला. त्यांनी त्यांच्या मौलिकतेची बांधिलकी, शिक्षक म्हणून असलेला प्रभाव, शिस्तबद्ध वृत्ती, विनोदबुद्धी आणि गुरु–शिष्य परंपरेचा उल्लेख केला.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांनी लक्ष्मण पै यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून केली. त्यानंतर मडगांवचो आवाज यांच्या वतीने प्रभव नायक यांनी आकाश पै यांचा सत्कार केला. यानंतर आकाश पै यांच्या हस्ते लक्ष्मण पै यांचे पाच ज्येष्ठ विद्यार्थी — प्रा. महेश वेंगुर्लेकर, प्रा. निरुपा नाईक, श्रीधर कामत बांबोळकर, महेंद्र आल्वारीस आणि संजय हरमलकर यांचा गौरव करण्यात आला.
या शताब्दी वर्ष समारंभाला प्रा. अशोक शिरोडकर, डॉ. गोविंद काळे, सागर नाईक मुळे, डॉ. प्रदीप बोरकर, विशाल पै काकोडे, मावजो कुटुंबीय, यतिश दळवी, डॉ. राजेंद्र सावर्डेकर, दत्तराज पै फोंडेकर, भाई नायक तसेच अनेक मान्यवर व लक्ष्मण पै यांचे हितचिंतक उपस्थित होते.
