google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
गोवा

‘त्या’ लाभार्थ्यांना तात्काळ अर्थसहाय्य द्या’

पणजी:

आम आदमी पक्षाच्या महिला विंगच्या अध्यक्ष अॅड. प्रतिमा कुतिन्हो यांनी दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेच्या लाभार्थ्यांना वेळेवर आर्थिक मदत न दिल्याबद्दल भाजप सरकार आणि समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई यांच्यावर गुरूवारी टीका केली.

याशिवाय चार महिन्यांची प्रलंबित आर्थिक मदत या दोन आठवड्यांत द्यावी अशी मागणीही त्यांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि मंत्री सुभाष फळदेसाई यांच्याकडे केली आहे.

दयानंद सामाजिक सुरक्षा योजना ज्येष्ठ व्यक्ती, विधवा आणि विशेष व्यक्तींना आर्थिक मदत देण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आली होती. दर महिन्याला १.३७ लाख लोकांना या योजनेचा फायदा होतो. १.३७ लाख लोकांपैकी १२ हजार लोक विशेष व्यक्ती आहेत. यापैकी बरेच विशेष व्यक्ती आणि ज्येष्ठ लोक औषधोपचार आणि इतर गरजांसाठी योजनेवर पूर्णपणे अवलंबून आहेत.

पक्षाच्या पणजी कार्यालयात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना कुतिन्हो म्हणाल्या, “जेव्हा माध्यमांनी ही समस्या मांडली, तेव्हा सुभाष फळदेसाई यांनी लवकरात लवकर अर्थसहाय्य प्रदान करणार असल्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर एक महिन्याची रक्कम वितरीत करण्यात आली. मात्र, अजूनही लाभार्थ्यांना तीन महिन्यांची आर्थिक मदत मिळालेली नाही. आता मे महिनाही निघून गेला. त्यामुळे पुन्हा चार महिन्यांचे अर्थसहाय्य देणे बाकी आहे”.

कुतिन्हो पुढे म्हणाल्या, “अंत्योदय तत्त्वज्ञानाचे पालन करणाऱ्या भाजप सरकारकडे शपथविधी सोहळ्यासाठी आणि त्यांच्या हायकमांड, अमित शहा यांना 850 रुपये किमतीचे पाणी देण्यासाठी पैसे आहेत. मात्र, हेच सरकार दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेच्या लाभार्थ्यांना मासिक मदत देण्यास असमर्थ ठरले आहेत, याचे आश्चर्य वाटते”.

कोविडमुळे वेळेवर अर्थसहाय्य प्रदान करू शकलो नाही, असे वक्त्तव्य फळदेसाई यांनी केले होते. मात्र, याच कोविड काळात भाजपा सरकारने सरकार तुमच्या दारी, निवडणूक प्रचारासाठी अशा विविध कार्यक्रमासाठी भरमसाठ पैसा खर्च केला. त्यामुळे फळदेसाई यांनी कारणे न देता लवकरात लवकर अर्थसहाय्य प्रदान करावे अशी मागणी त्यांनी केली.

कोणत्याही सामाजिक किंवा आर्थिक घडामोडीमुळे लोकांचा राहणीमान आणि जीवनमानाचा दर्जा यावर विपरीत परिणाम होणार नाही याची खात्री करणे हा सामाजिक सुरक्षिततेचा मूळ उद्देश आहे. मात्र, हेच सामाजिक सुरक्षा प्रदान करण्यात भाजप सरकार पूर्णपणे अपयशी ठरलेले आहे असे कुतिन्हो म्हणाल्या.

महिला आणि बाल कल्याण खात्याकडे कोविड काळात लाडली लक्ष्मी योजनेसाठी एकूण 1,04,218 अर्ज आले आहेत. त्यापैकी 74,186 मंजूर झाले आहेत आणि 19471 सध्या मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. याशिवाय गृह आधार योजना मिळवण्याकरिता 1,91,838 अर्ज आले आहेत. त्यापैकी 1,65,724 मंजूर झाले आहेत आणि 12,658 अद्याप मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. शिवाय, लाडली लक्ष्मी योजनेंतर्गत 2018 पासूनची थकबाकी आहे. आज लाडली लक्ष्मी योजनेच्या काही लाभार्थ्यांची लग्ने झाली आहेत आणि त्यांना आता एक मूलही आहे, परंतु ते अजूनही पैशाची वाट पाहत आहेत, कुतिन्हो म्हणाल्या.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!