
गोवा
दिगंबर कामत, रमेश तवडकरांना मिळाली ‘हि’ खाती
पणजी: अखेर सात दिवसांच्या प्रतिक्षेनंतर माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत व माजी सभापती रमेश तवडकर यांना खातीवाटप करण्यात आली आहेत. मागच्या गुरुवारपासून या नवनिर्वाचित मंत्र्यांचे खातेवाटप रखडले होते.
राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू यांनी २१ ऑगस्ट रोजी दिगंबर कामत व रमेश तवडकर यांना मंत्रीपद आणि गोपनीयतेची शपथ दिली होती. त्यानंतर कामत व तवडकर यांना कोणती खाती मिळणार याबाबत मोठी उत्सुकता होती. अखेर २७ ऑगस्ट रोजी झालेल्या खातेवाटपात कामत यांना सार्वजनिक बांधकाम (PWD), बंदर-कप्तान व वजन- माप ही खाती सोपविण्यात आली. तर तवडकर यांना क्रीडा, आदिवासी कल्याण तसेच कला व संस्कृती अशी महत्त्वाची खाती देण्यात आली आहेत.
मंत्रीपदाचा फेरफार बराचकाळ लांबला होता. यापूर्वी गोव्याचे पर्यावरण, कायदा आणि बंदर-कप्तान मंत्री आलेक्स सिक्वेरा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्याचबरोबर प्रियोळचे आमदार गोविंद गावडे यांना १८ जून रोजी मंत्रिमंडळातून वगळण्यात आले होते. त्यामुळे मंत्रिमंडळात फेरफार कधी होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागून होते.
रमेश तवडकर यांनी विधानसभेच्या सभापतीपदाचा राजीनामा दिला. त्यांच्या मंत्रीपदाच्या शपथेची चर्चा काही दिवसांपासून चालू होती. अखेर ती प्रत्यक्षात उतरली. माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्यासह तवडकर यांनी मंत्रिमंडळात प्रवेश केला आहे.