शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्यात बैठक
मुंबई:
राज्यातील सुरू असलेल्या पेचप्रसंगावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यामध्ये बैठक झाली. या बैठकीत शिवसेनेने आता रस्त्यावरची लढाई सुरू करावी यावर एकमत झाल्याचं समजतंय. तसेच 16 आमदारांवर कारवाईची कारवाई सुरू करण्यात यावी असंही ठरल्याचं समोर येत आहे.
या बैठकीमध्ये अजित पवार, जयंत पाटील, अनिल देसाई, संजय राऊत उपस्थित असल्याची माहिती आहे. या बैठकीनंतर आता उद्धव ठाकरे शिवसेनेच्या खासदारांसोबत बैठक घेणार आहेत.
एकनाथ शिंदेंच्या सोबत असलेल्या बंडखोर आमदारांवर दबाव निर्माण करण्यासाठी शिवसेनेने आता रस्त्यावर उतरावं, रस्त्यावरची लढाई सुरू करावी असं या बैठकीत ठरल्याचं समजतंय. तसेच यामध्ये जास्तीत जास्त वेळकाढूपणा करावा, जेणेकरून शिंदे गटातील आमदारांवर अतिरिक्त दबाव तयार होईल असंही ठरलं आहे.
शिवसेनेच्या बंडखोर 16 आमदारांवर कारवाई करण्यासाठी आता प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी कायद्याच्या बाजू तपासण्यास सुरुवात केल्याची माहिती आहे.