महाराष्ट्र

ज्येष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांचे निधन

पुणे :

ज्येष्ठ साहित्यिक-समीक्षक, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरु आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डाॅ. नागनाथ लालूजीराव कोत्तापल्ले (वय ७४ ) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, मुलगा, सून आणि नातवंडे असा परिवार आहे.

साठोत्तरी कालखंडात कविता, कथा, दीर्घकथा, कादंबरी, ललित गद्य आणि समीक्षा अशा विविध वाङ्मयप्रकारांत दर्जेदार वाङ्मयनिर्मिती करणारे नागनाथ कोत्तापल्ले यांचा जन्म २९ मार्च १९४८ रोजी मुखेड (जि. नांदेड) या गावी झाला. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण देगलूर येथे झाले. बी.ए. आणि एम.ए. या दोन्ही परीक्षांत मराठवाडा विद्यापीठात ते प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले होते. ते कुलपतींच्या सुवर्णपदकाने सन्मानित झाले होते. ‘शंकर पाटील यांच्या साहित्याचा चिकित्सक अभ्यास’ या विषयावर शोधप्रबंध लिहून त्यांनी १९८० साली पीएच.डी. पदवी संपादन केली. बीड येथील महाविद्यालयात १९७१ ते १९७७ या काळात मराठीचे अधिव्याख्याता म्हणून काम केल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये त्यांनी अधिव्याख्याता आणि प्रपाठक या पदांवर १९७७ ते १९९६ या काळात काम केले.

१९९६ ते २००५ या कालावधीत पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागात प्राध्यापक आणि विभाग प्रमुख म्हणून काम केले. २००५ सालापासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे ते कुलगुरू झाले. व्यासंगी, अध्यापनकुशल, उपक्रमशील आणि विद्यार्थिप्रिय प्राध्यापक म्हणून त्यांनी लौकिक मिळवला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण मंडळाचे संचालक आणि पुणे विद्यापीठाच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर अध्यासनाचे समन्वयक या पदांवरून त्यांनी उल्लेखनीय कार्य केले.

श्रीगोंदा येथे १९९९ साली झालेल्या ग्रामीण साहित्य संमेलनाचे आणि २००५ साली जालना येथे झालेल्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. चिपळूण येथे २०१२ मध्ये झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते. राज्य शासनाच्या भाषा सल्लागार समितीचे ते अध्यक्ष होते.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!
%d bloggers like this: