भारताचे महान फिरकीपटू बिशन सिंग बेदी यांचं निधन
७० च्या दशकात भारतीय फिरकी आक्रमणाचा कणा ठरलेले महान फिरकीपटू बिशन सिंग बेदी यांचं निधन झालं आहे. ते ७७ वर्षांचे होते. बिशन सिंग बेदी यांनी १९६७ ते १९७९ या काळात ६७ कसोटी सामन्यांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं. आपल्या १३ वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीत त्यांनी २६६ विकेट्स घेतल्या. त्याशिवाय तेव्हा नुकत्याच सुरू झालेल्या एकदिवसीय क्रिकेटमध्येही त्यांच्या नावावर सात विकेट्स आहेत.
इरापल्ली प्रसन्ना, बी. एस. चंद्रशेखर आणि एस. वेंकटराघवन यांच्यासह बिशन सिंग बेदी ही चार नावं भारतीय फिरकीच्या इतिहासात अजरामर झाली आहेत. भारतीय क्रिकेटमध्ये फिरकीचं एक नवं युग या चौघांनी सुरू केलं. त्यात बिशन सिंग बेदी यांचा वाटा मोठा होता. भारताच्या पहिल्या वहिल्या एकदिवसीय सामन्यात बिशन सिंग बेदी यांच्या अद्भुत अशा स्पेलमुळे भारतानं विजय साकारला होता.
१९७५ सालच्या विश्वचषक सामन्यामध्ये इस्ट आफ्रिका संघाविरुद्ध भारतीय संघ मैदानात उतरला होता. त्यावेळी बिशन सिंग बेदी यांच्या जादुई फिरकी गोलंदाजीमुळे इस्ट आफ्रिका संघाला १२० धावांवर रोखणं भारताला शक्य झालं. या सामन्यात बेदी यांनी १२ षटकांतली तब्बल ८ षटकं निर्धाव टाकली होती. उरलेल्या चार षटकांत सहा धावांच्या मोबदल्यात त्यांनी एक गडी बाद केला होता.
बिशन सिंग बेदी यांचा जन्म २५ सप्टेंबर १९४६ रोजी अमृतसरमध्ये झाला होता. तेव्हा त्यांच्या फिरकी गोलंदाजीच्या विशिष्ट शैलीमुळे ते चर्चेत आले होते. २०व्या वर्षी, अर्थात १९६६ साली त्यांनी त्यांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीला सुरुवात केली.
दरम्यान, बिशन सिंग बेदी यांच्या नेतृत्वाखाली भारतानं इंग्लंडविरुद्ध साकार केलेला ऐतिहासिक मालिकाविजय त्यांच्या कारकिर्दीतला मानाचा तुरा ठरला. भारतीय संघाचे तेव्हाचे कर्णधार अजित वाडेकर यांच्या अनुपस्थितीत बिशन सिंग बेदी यांच्याकडे भारतीय संघाचं कर्णधारपद आलं होतं. तेव्हा इंग्लंडसारख्या बलाढ्य संघाचं आव्हान भारतीय संघासमोर होतं. मात्र, बिशन सिंग बेदी यांनी आपल्या नेतृत्वशैलीचं उत्तम दर्शन घडवत त्या मालिकेत भारताला विजय मिळवून दिला. भारतीय संघाच्या क्रिकेट विश्वातील देदिप्यमान भवितव्याची नांदी त्या मालिका विजयाने खऱ्या अर्थाने जगाने पाहिली!