
बाय लोर्नांना पद्म पुरस्कार का नाही? : प्रभव नायक
मडगाव :
गोव्याची नाइटिंगेल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुप्रसिद्ध गायिका बाय लोर्ना कोर्देरो यांचे नाव पुन्हा एकदा पद्म पुरस्कार यादीत नसल्याने मडगांवचो आवाज व युवा नेते प्रभव नायक यांनी तीव्र निराशा व्यक्त केली आहे. कोंकणी संगीत व गोव्याच्या सांस्कृतिक ओळखीला जागतिक स्तरावर पोहोचवण्यात लोर्नांचे योगदान अतुलनीय आहे, असे प्रभव नायक यांनी म्हटले आहे.
प्रभव नायक यांनी आठवण करून दिली की ९ ऑगस्ट २०२५ रोजी लोर्नां यांच्या वाढदिवशी मडगांवचो आवाजच्या वतीने त्यांना गोमंत विभूषण हा राज्याचा सर्वोच्च नागरी सन्मान देण्यात यावा तसेच त्यांच्या नावाची पद्म पुरस्कारासाठी शिफारस करण्यात यावी, अशी औपचारिक मागणी करण्यात आली होती. संगीतप्रेमी व सांस्कृतिक कार्यकर्त्यांच्या व्यापक पाठिंब्यानंतरही यावर कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही, असे त्यांनी सांगितले.
“ लोर्ना केवळ गायिका नाहीत, तर त्या एक चालती-बोलती संस्था आहेत. त्यांच्या आवाजातून गोव्याचा आत्मा त्यांनी देश-विदेशात पोहोचवला. कोंकणी संगीताला ओळख, सन्मान आणि जागतिक प्रतिष्ठा मिळवून देण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे,” असे प्रभव नायक म्हणाले.
गोव्याची भाषा, कला आणि संस्कृतीसाठी आयुष्य वाहून घेतलेल्या खऱ्या योगदानकर्त्यांना वेळेवर सन्मान न मिळणे ही गंभीर बाब असून, यामुळे गोव्याच्या सांस्कृतिक वारशाबाबतची असंवेदनशीलता दिसून येते, असेही त्यांनी नमूद केले.
प्रभव नायक यांनी मागणी केली की लोर्ना कोर्देरो यांना तात्काळ गोमंत विभूषण देण्यात यावे तसेच त्यांच्या नावाची पद्म पुरस्कारासाठी शिफारस करण्यात यावी. “बाय लोर्नांचा सन्मान न करणे म्हणजे गोव्याच्या आत्म्याचाच अपमान आहे. कला व संस्कृतीद्वारे गोव्याला अभिमान व ओळख देणाऱ्यांना गोमंतकीय कदापी विसरणार नाहीत,” असे प्रभव नायक यांनी ठामपणे सांगितले.

