
राज ठाकरे बाळा नांदगावकरांना हड ‘का’ म्हणाले?
राज ठाकरे म्हणाले, मुंबईत एक बैठक लावली होती. मुंबईतील शाखा अध्यक्ष , उपाध्यक्ष हजर झाले नाहीत. त्यांची हजेरी घेतली. प्रत्येकाला विचारलं, कारणं एक एक दिली. घरचे ते आजारी, हे होतं, ते होतं. पाच सहा जणांनी सांगितलं कुंभला गेलो होतो. म्हटलं गधड्यांनो पापं करता कशाला. हेही विचारलं आल्यावर अंघोळ केली ना. आमचे बाळा नांदगावकर कमंडलूमधून पाणी घेऊन आले. म्हटलं हड.. मी नाही पिणार, असं म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मनसेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात टोलेबाजी केली आहे. त्यांच्या या टोलेबाजीनंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.
पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले की, पूर्वीच्या काळी ठिक होतं. आता सोशल मीडिया आला. माणसं, तिथं आलेल्या बायाबिया घासतात. आणि बाळा नांदगावकर साहेब गंगेचं पाणी. अरे कोण पिणार ते पाणी? आताच करोना गेला. त्याच्याशी कोणाला घेणं देणं नाही. दोन वर्ष तोंडाला फडकी बांधून फिरले. तिकडे जाऊन आंघोळ करतात. मी कित्येक स्विमिंग पुल पाहिले. आधी निळे होते. नंतर हिरवे झाले. कोण जाऊन पडेल त्यात? त्याने तिथे काही तरी केलं, ते मी इथे पितो. श्रद्धेला काही अर्थ आहे की नाही? एक नदी या देशातील स्वच्छ नाही. परदेशातील नद्या स्वच्छ. ते काही माता म्हणत नाही. तरी नद्या स्वच्छ. आपल्याकडे पोल्युशनचं पाणी अस्वच्छ. राजीव गांधी असल्यापासून ऐकतोय गंगा साफ होणार. मध्ये राज कपूरने पिक्चर काढला. त्यात वेगळीच गंगा, असा मिश्किल विनोद राज ठाकरे यांनी केल्यानंतर सर्वांना हसू अनावर झाले.