WPL Auction Live : भारताच्या अनकॅप्ड खेळाडूवर १.३० कोटींचा वर्षाव
WPL auction live updates।
आज मुंबईत महिला प्रीमिअर २०२४ साठी लिलाव प्रक्रिया पार पडत आहे. सध्या सुरू असलेल्या लिलावात परदेशी खेळाडूंवर भारी बोली लागली. पण, एका भारतीय अनकॅप्ड खेळाडूने सर्वांनाच चकित केले. खरं तर भारताची अनकॅप्ड टॉप ऑर्डर फलंदाज वृंदा दिनेश हिने सर्वांना चकित केले. तिची मूळ किंमत १० लाख रुपये होती. तिला यूपी वॉरियर्सने १.३० कोटी रुपयांना आपल्या ताफ्यात घेतले. अनेक नामांकित खेळाडू अनसोल्ड राहिले असताना वृदांवर लागलेली ही बोली क्रिकेट वर्तुळात चर्चेचा विषय बनली आहे.
वृंदा दिनेशवर लागलेली बोली सर्वांचे लक्ष वेधणारी ठरली. ती कर्नाटककडून देशांतर्गत क्रिकेट खेळते. २३ वर्षीय फलंदाजाने वरिष्ठ महिला ट्वेंटी-२० ट्रॉफीमध्ये सात डावात १५४.०१ च्या स्ट्राईक रेटने २११ धावा केल्या आहेत. ती भारत अ संघाकडून इंग्लंड अ विरुद्ध खेळली होती.
दरम्यान, आयपीएलच्या धरतीवर सुरू झालेली महिला प्रीमिअर लीग आपल्या दुसऱ्या हंगामाकडे कूच करत आहे. आज मुंबईत महिला प्रीमिअर लीगच्या दुसऱ्या हंगामासाठी लिलाव पार पडत आहे. यावेळी एकूण १६५ खेळाडूंनी WPL २०२४ च्या लिलावासाठी नोंदणी केली आहे. यामध्ये १०४ भारतीय आणि ६१ परदेशी खेळाडू आहेत. १६५ क्रिकेटपटूंपैकी १५ खेळाडू सहयोगी देशांचे आहेत, तर कॅप्ड खेळाडूंची एकूण संख्या ५६ आणि अनकॅप्ड खेळाडू १०९ आहेत. पाच संघांकडे जास्तीत जास्त ३० स्लॉट उपलब्ध आहेत, त्यापैकी ९ जागा परदेशी खेळाडूंसाठी आहेत.