फुटबॉल महासंघावर ‘फिफा’ची निलंबनाची कारवाई
जागतिक फुटबॉल संघटनेने (FIFA) भारताला मोठा धक्का दिला असून फुटबॉल महासंघावर निलंबनाची कारवाई केली आहे. भारतीय फुटबॉल महासंघात (एआयएफएफ) तिसऱ्या पक्षाचा हस्तक्षेप वाढला असल्याने तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात येत असल्याचं फिफाने सांगितलं आहे. या कारवाईमुळे भारतामध्ये ऑक्टोबर महिन्यात नियोजित करण्यात आलेला महिला खेळाडूंचा ‘अंडर १७ वर्ल्ड कप’ रद्द झाला आहे.
सुप्रीम कोर्टाने मे महिन्यात भारतीय फुटबॉल महासंघ बरखास्त केलं होतं. तसंच खेळाचं नियोजन करण्यासाठी, महासंघाच्या घटनेत दुरुस्ती करण्यासाठी आणि गेल्या १८ महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या निवडणुका घेण्यासाठी तीन सदस्यीय समिती तयार केली होती.
प्रत्युत्तरादाखल, फिफा आणि आशियाई फुटबॉल महासंघाने एएफसीचे सरचिटणीस विंडसर जॉन यांच्या नेतृत्वाखालील एक पथक भारतीय फुटबॉल भागधारकांना भेटण्यासाठी पाठवलं. एआयएफएफने जुलैच्या अखेरपर्यंत आपल्या कायद्यात सुधारणा करावी आणि १५ सप्टेंबपर्यंत निवडणुका घेण्यासाठी धोरण आखावं यासाठी हे पथक आलं होतं.
“एआयएफएफ कार्यकारी समितीचे अधिकार ग्रहण करण्यासाठी प्रशासकांची समिची स्थापन करण्याचा आदेश रद्द झाल्यानंतर आणि एआयएफएफ प्रशासनाला दैनंदिन कामकाजाचं नियंत्रण मिळाल्यानंतर निलंबन मागे घेण्यात येईल,” असं फिफाने आपल्या निवेदनात सांगितलं आहे.
फिफाच्या नियमांनुसार, सदस्य असणाऱ्या देशातील संस्थांमध्ये कायदेशीर आणि राजकीय मध्यस्थी होता कामा नये. फिफाने याआधीही इतर देशातील काही राष्ट्रीय संघटनांवर याच कारणामुळे निलंबनाची कारवाई केली आहे.