
‘या’ तारखेला होणार बहुप्रतीक्षित राज्य सिनेमहोत्सव
गोवा मनोरंजन सोसायटीच्यावतीने होत असलेल्या गोवा राज्य चित्रपट महोत्सवाला येत्या १४ ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. १७ ऑगस्टपर्यंत हा महोत्सव चालणार असून, मॅकेनिझ पॅलेस आणि आयनॉक्सच्या थिएटरमध्ये या महोत्सवातील चित्रपट दाखविले जाणार आहेत. या महोत्सवात स्पर्धेतील विजेत्या चित्रपट व विविध विभागांसाठी बक्षिसे दिली जाणार असल्याची माहिती मनोरंजन सोसायटीचे चेअरमन तथा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज दिली.
मुख्यमंत्री म्हणाले, चित्रपट महोत्सवाची दहा-अकरा आणि बारावी आवृत्ती एकत्रितरीत्या होत आहे. १४ ऑगस्ट रोजी महोत्सवाचा शुभारंभ आणि १७ रोजी समारोप होणार आहे.
या महोत्सवातील १० व्या आवृत्तीसाठी १ जानेवारी २०१८ ते ३१ डिसेंबर २०१९ या दरम्यान निर्माण झालेल्या चित्रपटांचा, ११ व्या आवृत्तीसाठी १ जानेवारी २०२० ते ३१ डिसेंबर २०२१ आणि १२ व्या आवृत्तीसाठी १ जानेवारी २०२२ ते ३१ डिसेंबर २०२३ या दरम्यान निर्माण झालेले चित्रपट असावेत. या महोत्सवात कार्यशाळा, चर्चासत्र, मार्केट संवाद असेही कार्यक्रमहोणार आहेत.
या महोत्सवात प्रादेशिक मराठी व कोकणी भागाषेतील चित्रपटांचा समावेश असेल. मराठी व कोकणी विभाग असे महोत्सवात असतील. मात्र, नॉन फिचर फिल्म या विभागात मात्र मराठी-कोकणी दोन्ही भाषेतील चित्रपटांचा समावेश असेल. महोत्सव सर्वांसाठी मोफत असून, प्रेक्षकांना आपली नोंदणी करून थिएटरचा प्रवेश पास घ्यावा लागणार आहे.
या महोत्सवात इफ्फीच्या धर्तीवर लघुपट निर्माण करणाऱ्यांसाठी स्पर्धा असणार आहे. त्यात त्यांना दिलेल्या विषयांवर ४८ तासांत लघुपट तयार करावा लागणार आहे. त्यातील प्रथम विजेत्यास २५ हजार, द्वितीय विजेत्यास २० हजारांचे बक्षीस असेल. त्याशिवाय उत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी, उत्कृष्ट एडिटर, उत्कृष्ट दिग्दर्शक, उत्कृष्ट नायक व उत्कृष्ट अभिनेत्री अशी पाच प्रत्येकी १५ हजारांची बक्षिसे दिली जाणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी घोषित केले. या सर्व महोत्सवासाठी साधारण राज्य सरकारने साडेचार कोटींची तरतूद केलेली आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.
अशी असणार पारितोषिके
उत्कृष्ट चित्रपट: प्रथम- रु. ५ लाख, द्वितीय- रु. ३ लाख, उत्कृष्ट दिग्दर्शन: प्रथम- रु. ५ लाख, द्वितीय- रु. ३ लाख, तसेच उत्कृष्ट अभिनेता, उत्कृष्ट अभिनेत्री, उत्कृष्ट सहनायक, उत्कृष्ट सहनायिका, उत्कृष्ट बालकलाकार, उत्कृष्ट कथा, उत्कृष्ट संवाद, उत्कृष्ट गीते, उत्कृष्ट संगीत, उत्कृष्ट गायक-गायिका, उत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी, उत्कृष्ट एडिटर, उत्कृष्ट ऑडिओग्राफी, उत्कृष्ट कला दिग्दर्शक, उत्कृष्ट कॉस्च्युम डिझायनर अशी १७ वैयक्तिक बक्षिसे दिली जाणार असून, त्या बक्षिसाची रक्कम प्रत्येकी २५ हजारांचे असणार आहे.
नॉन फिचर फिल्मसाठी दोन (फिक्शन-नॉन फिक्शन) एक-एक लाखाची बक्षिसे दिली जाणार आहेत. या विभागात बेस्ट सिनेमॅटोग्राफी, ऑडिओग्राफी, एडिटिंग, संगीत दिग्दर्शन आणि थीम अशी पाच प्रत्येकी २५ हजारांची बक्षिसे दिली जाणार आहेत.