सिनेनामा 

जाणिवा, तंत्रज्ञान आणि चेतना यांमधून केलेली ‘स्पाइंग स्टार्स’ सफर

56 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘स्पाइंग स्टार्स’ चित्रपटासाठी घेतल्या गेलेल्या पत्रकार परिषदेत त्या चित्रपटाचा प्रवास अशा विलक्षण पद्धतीने चितारला गेला, की त्यातून मानवी जाणिवा, आध्यात्मिकता आणि डिजिटल माध्यमातून मांडले जाणारे वास्तव यांच्यातील नाजूक समतोल समोर आला. विमुक्थी जयसुंदरा दिग्दर्शित आणि नील माधब पांडा निर्मित या चित्रपटात इंदिरा तिवारी यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. मानवाचे अस्तित्व आणि पर्यावरण यांची गुंफण होऊन त्यातून एक अगदी अंतरंगातून उमटणारी आणि मैत्रीपूर्ण कहाणी कशी तयार होते, याचे दर्शन या चित्रपटातून घडते.

विमुक्थी जयसुंदरा यांनी चित्रपटातून मिळणाऱ्या संदेशाबद्दलचे चिंतन मांडत सत्र सुरु केले. यंत्रांच्या वाढत्या वर्चस्वाच्या जगात मानवी जाणिवा, एकमेकांशी जोडलेपणाची भावना आणि आध्यात्मिकता सांभाळत माणसे कशी वाटचाल करत आहेत- यावर त्यांनी भर दिला. “डिजिटल जगात मानवी चेतना कशी काम करते, यावर एक चित्रपट करणे महत्त्वाचे होते”, असे ते म्हणाले. निर्माता आणि दिग्दर्शक यांनी सांगितलेली एक मजेदार गोष्ट म्हणजे ते दोघे इफ्फीमध्येच पहिल्यांदा भेटले होते. त्यावेळी परीक्षण मंडळाचा भाग म्हणून झालेली त्यांची ओळख पुढे चित्रपटनिर्मितीसाठीच्या सहयोगापर्यंत फुलत गेली.

तंत्रज्ञान आणि आध्यात्मिकता यांचा मिलाफ घडवून आणणारा हिंदी चित्रपट निर्माण करण्यात आलेल्या आह्वानांबद्दल पांडा यांनी माहिती दिली. “विमुक्थी जयसुंदराने एका ओळीत गोष्ट सांगितली. आणि मला नवल वाटत राहिलं- हे खरंच तयार करता येईल? आज आपण ते प्रत्यक्ष पडद्यावर पाहत आहोत, हे छान आहे!” असे सांगत त्यांनी त्या कथनामध्ये – विज्ञान आणि मानवी अस्तित्वाचा गाभा यांतील जो नाजूक समतोल दिसत आहे- त्याची प्रशंसा केली.

आनंदीची भूमिका साकारताना निमग्न झाल्याचा जो अनुभव आला त्याबद्दल इंदिरा तिवारी बोलल्या. आनंदी ही एक शास्त्रज्ञ आहे. हनुमान द्वीपावरचे तिच्या जीवनाचे पर्व विलगीकरण (क्वारंटाईन), गूढरम्यता आणि मानवी जोडलेपणाची भावना यांनी युक्त आहे. “हे फक्त कथा-पटकथा-संवाद नसून ही मध्यवर्ती संकल्पना अगदी सकस, आणि अंतरंगातून उमटलेली आहे. ती मांडताना आम्हाला पूर्ण भानावर राहून जाणिवा-नेणिवा जाग्या ठेवून काम करावं लागलं”- अशा शब्दांत इंदिरा यांनी त्यांचा अनुभव सांगितला.

हा चित्रपट म्हणजे वर्तमान अस्तित्व, वर्तमानाबद्दलची समज आणि असामान्य तसेच परिवर्तनकारी अनुभवांमधून जाणारा मानवी प्रवास यांचा संगम आहे, अशा शब्दांत विमुक्थी जयसुंदरा यांनी चित्रपटाचे वर्णन केले. डोळ्यांचे पारणे फेडणारे निसर्गसौंदर्य तर यात आहेच, परंतु तोच निसर्ग, तेच पर्यावरण एक पात्र म्हणूनही चित्रपटात उतरते आणि कथेला एक जीवाकार देते. “परिसंस्थेची शृंखला, पर्यावरण, तंत्रज्ञान आणि आध्यात्मिकता यांची एकत्र गुंफण या चित्रपटात आहे. आणि मूळ कथनाचा प्रतिध्वनी तिच्यामुळे विविध पातळ्यांवर उमटताना दिसेल” असे नील माधब पांडा यांनी सांगितले.

बुसान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात या चित्रपटाचा प्रीमिअर झाला, तेव्हाचा अनुभव आणि त्याला आंतरराष्ट्रीय पातळीवर मिळालेला प्रतिसाद याबद्दलही या त्रिकूटाने सांगितले. हनुमान द्वीप म्हणून जेथे चित्रीकरण केले, ते स्थळ तेथील निसर्ग आणि पौराणिक, ऐतिहासिक संदर्भाने  निवडले होते- असे विमुक्थी जयसुंदरा यांनी सांगितले. तर ‘तेथे पोहोचल्यावर एका वेगळ्याच जगात कोणीतरी नेऊन ठेवल्यासारखे वाटले’- असा अभिप्राय नील माधब पांडा यांनी नोंदवला. खऱ्याखुऱ्या चित्रीकरण स्थळावर काम करताना चित्रपटात जी उत्स्फूर्तता ओतली जाते, अजिबात अंदाज नसलेल्या गोष्टी घडल्यामुळे जो जिवंतपणा येतो- त्यांवर प्रकाश टाकत इंदिरा तिवारी यांनी अशा परिस्थितीत काम करणे आह्वानात्मक आणि त्याचवेळी अत्यंत समाधानकारक होते- असे सांगितले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!