सिनेनामा 

चित्रपट जाणू इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी ‘लिजेंड्स ऑफ इंडियन सिल्व्हर स्क्रीन’महत्त्वपूर्ण

‘द लेजेंड्स ऑफ इंडियन सिल्व्हर स्क्रीन’ – प्रकाशन विभाग संचालनालय (डीपीडी) कडून प्रकाशित झालेल्या या नवीनतम प्रकाशनाचे अनावरण आज संध्याकाळी डीपीडीचे प्रधान महासंचालक भूपेंद्र कैंथोला आणि प्रसिद्ध कोकणी चित्रपट निर्माते राजेंद्र तलक यांच्या हस्ते गोव्यात 56 व्या इफ्फी येथे पीआयबी पत्रकार परिषदेच्या सभागृहात झाले.

“भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च सन्मान मानला जाणारा दादासाहेब फाळके पुरस्कार जिंकणाऱ्या दिग्गजांचा प्रवास प्रत्येकाला माहीत असला पाहिजे. 1969 ते 1991 या कालावधीत हा पुरस्कार मिळवणाऱ्या देविका राणी, सत्यजित रे, व्ही. शांताराम, लता मंगेशकर आणि इतर अशा 23 पुरस्कार विजेत्यांबद्दल या पुस्तकात विवेचन करण्यात आले आहे.” आपल्या प्रारंभिक भाषणात कैंथोला यांनी पुस्तकाचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले.

त्यांनी पुढे स्पष्ट केले की, “हे पुस्तक 17 वेगवेगळ्या लेखकांनी लिहिलेल्या 23 लेखांचे संकलन आहे, ज्याचे संकलन संपादक संजीत नार्वेकर यांनी केले आहे. या प्रकाशनाचा एक रोमांचक पैलू म्हणजे दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते मिथुन चक्रवर्ती आणि आशा पारेख यांनी पुस्तकासाठी प्रस्तावना लिहिली आहे.” कैंथोला यांनी पुस्तकाच्या आशयाची झलक प्रेक्षकांना देण्यासाठी प्रस्तावनेतील काही उतारे देखील वाचून दाखवले.

कैंथोला यांनी डीपीडीच्या मोहिमेबद्दल सविस्तरपणे माहिती दिली की, “अशा महत्त्वाच्या विषयांवरील पुस्तकांची छपाई परवडणाऱ्या किंमतीत करण्याची जबाबदारी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या संचालनालयाकडे सोपवण्यात आली आहे. हे पुस्तक संशोधकांसाठी तसेच चित्रपटांना आकर्षक पृष्ठभागाच्या पलीकडे जाऊन जाणून घेऊ इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी विशेषत्वाने महत्त्वाचे आहे.”

राजेंद्र तलक यांनी कैंथोला यांच्या निरीक्षणाशी सहमती दर्शवत या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले. या उपक्रमाबद्दल त्यांनी प्रकाशन विभाग संचालनालयाचे अभिनंदन केले. “या दिग्गजांनी आजच्या पिढीला कल्पनाही करता येणार नाही अशा विपरीत परिस्थितीत  चित्रपट तयार केले. चित्रपट निर्मितीची कला समजून घेऊ इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी हे पुस्तक मूलभूत ‘एबीसी’ म्हणून काम करेल.” असे त्यांनी सांगितले.

या दिगजांच्या प्रेरणादायी कारकीर्दीचे उदाहरण देत यश किंवा अपयशाची पर्वा न करता कठोर परिश्रमावर लक्ष केंद्रित करण्याच्या महत्त्वावर त्यांनी भर दिला.

एका प्रश्नाच्या उत्तरात, कैंथोला म्हणाले, “निःसंशयपणे, चित्रपट ही एक सॉफ्ट पॉवर आहे, परंतु भारतात ती एक परंपरा देखील आहे. ग्लॅमरच्या बाह्य थराच्या पलीकडे पाहत आपण त्या परंपरेतून शिकले पाहिजे.” त्यांनी लेखनातील प्रामाणिकपणाच्या महत्त्वावर देखील भर दिला आणि अधिक व्यापक वाचक वर्ग मिळावा यासाठी पुस्तकाची भाषा सोपी ठेवली पाहिजे, असे मत व्यक्त केले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!