गोवा

७५ लाखांच्या गणेश पॅंडल स्कॅंडलवर दिगंबर कामत यांनी बोललेच पाहिजे : प्रभव नायक

मडगाव: मडगाव सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळाच्या ७५ लाखांच्या गणेश मंडप घोटाळ्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर सार्वजनिक निधीच्या गंभीर गैरवापराचे चित्र उघड झाले आहे. हा घोटाळा गणेश चतुर्थीनंतर २०२५ मध्ये उघडकीस आला, मात्र मडगावचे आमदार व सध्याचे साबाखा मंत्री दिगंबर कामत यांनी आजपर्यंत मौन बाळगले आहे. माघी गणेश जयंतीच्या पवित्र दिवशी मडगांवकरांना इतक्या गंभीर विषयावर अंधारात का ठेवले जात आहे, असा सवाल करत मडगांवचो आवाज व युवा नेते प्रभाव नायक यांनी सरकारकडून उत्तरदायित्व आणि पारदर्शकतेची ठाम मागणी केली आहे.

प्रभव नायक यांनी सांगितले की दिगंबर कामत यांनी तात्काळ पुढे येऊन आपण पारदर्शकता पाळण्याकडे की भ्रष्टाचारावर पांघरुण घालण्यासाठी, हे स्पष्ट केले पाहिजे. “हा किरकोळ प्रकार नसून ७५ लाखांच्या सार्वजनिक निधीचा गंभीर घोटाळा आहे. सत्ताधारी मंत्र्यांचे मौन संशय अधिक बळकट करते. मडगावच्या जनतेला चुकवेगिरी नव्हे तर स्पष्ट उत्तरे हवीत,” असे नायक म्हणाले.

 

नायक यांनी पुढे माहिती दिली की गेल्या वर्षी गणेश चतुर्थीनंतर हा घोटाळा समोर आल्यानंतर मडगांवचो आवाजने मडगावातील विविध गणेशोत्सव मंडळांकडे चौकशी केली. “जवळपास सर्वच मंडळांनी स्पष्टपणे सांगितले की गणेश मंडपाचा खर्च पूर्णपणे मंडळेच उचलतात आणि गेल्या तीन वर्षांत मंडपासाठी सरकारकडून कोणतीही आर्थिक मदत मिळालेली नाही,” असे त्यांनी नमूद केले.

ते पुढे म्हणाले की काही मंडळांनी त्यांच्या वार्षिक स्मरणिकांमध्ये प्रकाशित केलेली लेखापरीक्षित (ऑडिटेड) आर्थिक विवरणपत्रेही दाखवली. “ही लेखापरीक्षित विवरणपत्रे मंडपांसाठी आमदार निधी–पीडब्ल्यूडीतर्फे वापरल्याचा दावा खोटा ठरवते. श्री गणेशोत्सव मंडळे पारदर्शकपणे काम करत असताना सार्वजनिक निधी वापरण्याची परवानगी कोणी दिली आणि तो निधी नेमका कोणाच्या फायद्यासाठी वापरला गेला?” असा सवाल प्रभव नायक यांनी केला.

‘मडगांवचो आवाज’ने या ७५ लाखांच्या गणेश मंडप घोटाळ्याची सखोल चौकशी व संपूर्ण पैशांचा मागोवा (मनी ट्रेल) घेण्याची मागणी करत दक्षिण गोवा जिल्हाधिकारी यांच्याकडे औपचारिक तक्रार दाखल केली आहे. “इतक्या गंभीर प्रकरणावरील तक्रारीनंतरही आजपर्यंत कोणतीही कारवाई किंवा प्रतिसाद आम्हाला कळवण्यात आलेला नाही. प्रशासनाचे हे मौन अत्यंत धक्कादायक असून दोषींना वाचवण्याचा प्रयत्न तर नाही ना, असा गंभीर संशय निर्माण होतो,” असे नायक म्हणाले.

या सातत्यपूर्ण निष्क्रियतेच्या पार्श्वभूमीवर मडगांवचो आवाजने आता जिल्हाधिकाऱ्यांकडे दाखल केलेल्या तक्रारीवर नेमकी कोणती पावले उचलली गेली, याची माहिती मागण्यासाठी आरटीआय अर्ज दाखल केला आहे. “हा विषय आम्ही दडपून जाऊ देणार नाही. दिगंबर कामत यांनी मडगावच्या जनतेला उत्तर दिलेच पाहिजे. सार्वजनिक पैसा, सार्वजनिक श्रद्धा आणि गणेशोत्सवाचा वापर राजकीय हितसंबंध व आर्थिक गैरव्यवहार झाकण्यासाठी होऊ देणार नाही,” असे प्रभव नायक म्हणाले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!