
Budget 2026 :मुंबई-पुणे व पुणे-हैदराबाद हाय स्पीड रेल कॉरिडॉर होणार
नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण देशाचा अर्थसंकल्प मांडत आहेत. या अर्थसंकल्पाकडे संपूर्ण देशाच्या नजरा लागल्या आहेत. दरम्यान अर्थमंत्र्यांनी एक मोठी घोषणा केली आहे. पुणे, मुंबई हायस्पीड रेल कॉरिडॉरची मोठी घोषणा निर्मला सीतारामण यांनी केली आहे.
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी त्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणात घोषणा करताना सांगितलं की, देशात 7 हाय-स्पीड रेल्वे कॉरिडॉर बांधले जातील. यामध्ये मुंबई-पुणे, पुणे-हैदराबाद, हैदराबाद-चेन्नई, चेन्नई-बेंगळुरू, दिल्ली-वाराणसी आणि वाराणसी-सिलीगुडी हाय-स्पीड रेल्वे कॉरिडॉरचा समावेश आहे.
या सोबतच, अर्थमंत्र्यांनी त्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणात घोषणा केली की, येत्या 5 वर्षांत 20 नवीन जलमार्ग सुरू केले जाणार आहेत. तसेच, वाराणसी आणि पटना इथं जहाज दुरुस्ती सुविधा स्थापन केल्या जातील.
‘पर्यटन वाढीसाठी सी प्लेन सुरू करणार’ : पर्यटन वाढीसाठी सी प्लेन सुरू करण्याबाबतची मोठी घोषणादेखील निर्मला सीतारामण यांनी केली आहे. पर्यटन वाढवण्याच्या दृष्टीनं हे मोठं पाऊल मानलं जात आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी त्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणात आरोग्य, शिक्षण आणि रोजगारासाठी केलेल्या घोषणांचा उल्लेख केला. शिक्षणापासून रोजगार आणि उद्योजकतेकडे लक्ष केंद्रित केले जाईल. एआयसह तंत्रज्ञानाच्या प्रभावाचं मूल्यांकन करण्यासाठी एक उच्चस्तरीय समिती स्थापन केली जाईल.
सुधारणांसाठी सरकारनं अनेक पावलं उचलली- अर्थमंत्री : तत्पुर्वी, अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आपल्या भाषणात सांगितलं की, “सरकारनं सुधारणांच्या दिशेनं अनेक पावलं उचलली आहेत. पंतप्रधानांनी 2025 मध्ये स्वातंत्र्यदिनी याची घोषणा केली होती. त्यानंतर, अनेक सुधारणा अंमलात आणण्यात आल्या आहेत. यासाठी उच्चस्तरीय समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. केंद्र सरकार रिफॉर्म अंमलात आणण्यासाठी राज्य सरकारांसोबत काम करत आहे. रिफॉर्म एक्सप्रेस त्याच्या गंतव्यस्थानाकडे वाटचाल करत आहे. पहिल्या कर्तव्या अंतर्गत, सहा क्षेत्रांमध्ये पावलं उचलली जातील. उदाहरणार्थ, 7 क्षेत्रांवर लक्ष केंद्रित केलं जाईल. चॅम्पियन एमएसएमईकडे लक्ष दिलं जाईल. शहरी भागातील आर्थिक पायाभूत सुविधा मजबूत केल्या जातील.”
बायोफार्मा शक्ती: हा उपक्रम ज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोपक्रमाद्वारे विकासाला चालना देईल. परवडणाऱ्या औषधांवर लक्ष केंद्रित केलं जाईल. भारताला जागतिक बायोफार्मास्युटिकल हब बनवण्यावर लक्ष केंद्रित केलं जाईल. पुढील 5 वर्षांत या उपक्रमासाठी 10,000 कोटी रुपये खर्च केले जातील. तीन नवीन राष्ट्रीय बायोफार्मास्युटिकल संस्था स्थापन केल्या जातील. विद्यमान सात संस्थांचे अपग्रेड केलं जाईल. केंद्रीय औषध नियंत्रण संघटना अपग्रेड केली जाईल.
सेमीकंडक्टर मिशन: हे मिशन उद्योग-आधारित प्रशिक्षण केंद्रांवर लक्ष केंद्रित करेल. इलेक्ट्रॉनिक घटक उत्पादन योजनेनं आधीच त्याचे दुप्पट लक्ष्य साध्य केले आहे. सेमीकंडक्टर मिशनसाठी 40,000 कोटींचा खर्च प्रस्तावित आहे.







