भारताची अर्थकथा: वाढ, वास्तव आणि जबाबदारी
सध्या एकूण जीडीपीच्या सुमारे ६१.५ टक्क्यांवर खासगी क्षेत्र पोहोचले असून, ही अर्थव्यवस्थेसाठी सकारात्मक बाब आहे. वाढते उत्पन्न आणि रोजगारातील स्थैर्य यामुळे देशांतर्गत मागणीला चालना मिळाली असली तरी, रोजगाराच्या गुणवत्तेचा प्रश्न महत्वाचा नकीच आहे. देशात रोजगारनिर्मिती होत असली तरी, त्यातील किती रोजगार स्थिर, सामाजिक सुरक्षायुक्त आणि दीर्घकालीन उत्पन्न देणारे आहेत, हा मुद्दा महत्त्वाचा ठरतो. विशेषतः असंघटित क्षेत्रातील रोजगार अजूनही अस्थिर आणि असंरक्षित असल्याचे वास्तव कायम आहे.
महागाईवर मिळवलेले नियंत्रण हे सर्वसामान्य नागरिकाच्या दृष्टीने मोठे यश मानले जाते. सरासरी चलनवाढ १.७ टक्क्यांवर येणे म्हणजे जीवनावश्यक खर्चाच्या जागतिक संकटाच्या पार्श्वभूमीवर दिलासा देणारी बाब आहे. पुरवठा व्यवस्थापन आणि धोरणात्मक हस्तक्षेपांमुळे किमतीमध्ये स्थैर्य साधले गेले आहे. मात्र, महागाई कमी असली तरी उत्पन्नातील विषमता आणि रोजगारातील अस्थिरता यामुळे सर्व स्तरांना त्याचा समान लाभ मिळतोच असे नाही.
वित्तीय शिस्त आणि बँकिंग सुधारणा
वाढ साधताना वित्तीय शिस्त राखण्याचा प्रयत्न स्पष्टपणे दिसतो. कर्ज ते जीडीपी गुणोत्तर कमी करत पायाभूत सुविधांवरील खर्च वाढवणे ही संतुलित धोरणात्मक दिशा मानता येईल. बँकिंग क्षेत्रातील बुडीत कर्जांचे प्रमाण ऐतिहासिक नीचांकी पातळीवर येणे ही निश्चितच दिलासादायक बाब आहे. तरीही, लघु आणि मध्यम उद्योगांना कर्जपुरवठा सुलभ होत आहे का, हा प्रश्न अर्थव्यवस्थेच्या तळागाळातील गती ठरवणारा आहे.
पायाभूत सुविधा, तंत्रज्ञान आणि प्रादेशिक विषमता
महामार्ग, विमानतळ, द्रुतगती दळणवळण प्रकल्प यांमुळे संपूर्ण देश एकमेकांशी जोडला जात आहे. तंत्रज्ञान क्षेत्रातील होत असलेल्या गुंतवणुकीमुळे देशाला जगात अधिक महत्वाचे स्थान मिळवून देत आहे. मात्र, या विकासाचा लाभ सर्व प्रदेशांना समान प्रमाणात मिळतो आहे असे होताना दिसत नाही. काही राज्ये आणि शहरे प्रगतीच्या पुढील टप्प्यावर पोहोचत असताना, काही ठिकाणी अजूनही मूलभूत पायाभूत सुविधा दिसत नाहीत. त्यामुळे हि प्रादेशिक विषमता कमी करणे हे पुढील टप्प्यातील मोठे आव्हान ठरणार आहे.
सामाजिक विकास आणि ग्रामीण वास्तव
देशातील कमी होत असलेली गरिबी, त्याचप्रमाणे मुबलक पिण्याचे पाणी आणि सरकारी योजनांमुळे मिळालेली घरे हे सामाजिक धोरणांचे सकारात्मक परिणाम दर्शवतात. महिलांचा आर्थिक सहभाग वाढत असल्याचे आकडेही महत्त्वाचे आहेत. त्याचवेळी या बदलांचा ग्रामीण जीवनावर नेमका काय परिणाम होतो आहे, याचे ठोस आकडे अद्याप पुरेसे समोर येत नाही आहेत. तंत्रज्ञान, डिजिटल सेवा आणि कल्याणकारी योजनांमुळे ग्रामीण भागातील जीवन सुलभ होत असले तरी, स्थलांतर, शेतीतील उत्पन्नाची अनिश्चितता आणि स्थानिक रोजगाराच्या मर्यादा अजूनही अनेक कुटुंबांसमोर आहेत.
शिक्षण, कौशल्ये आणि असंघटित क्षेत्र
डिजिटल झालेले शिक्षण क्षेत्र, आणि कौशल्य विकासावर दिला जाणारा भर भविष्यासाठी खूपच महत्त्वाचा आहे. तरीही, या कौशल्यांचे रूपांतर संघटित आणि सुरक्षित रोजगारात कितपत होत आहे, हा प्रश्न उरतोच. असंघटित क्षेत्र अजूनही मोठ्या प्रमाणावर अर्थव्यवस्थेचा आधार आहे, आणि त्या क्षेत्रातील कामगारांचे संरक्षण आणि स्थिर उत्पन्न ही विकासाच्या पुढील टप्प्यातील कळीची बाब ठरणार आहे.





