google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
अर्थमत/ टेक्नॉलॉजीगोवा

‘काय’ ठरले एअरबीएनबी आणि गोव्याच्या पर्यटन खात्याच्या सामंजस्य करारात..?

पणजी:

एअरबीएनबीने आज गोव्यातील पर्यटन खात्यासोबत सामंजस्य करार केला. भारत आणि जगभरातील एक सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळ म्हणून गोव्याला चालना देण्यासाठी या करारातून एकत्रित प्रयत्न केले जाणार आहेत. गोव्यातील आजवर फारशा प्रसिद्ध नसलेल्या मात्र अनोख्या अशा स्थळांवर पर्यटनाला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न या भागीदारीतून केला जाणार आहे. तसेच, राज्यात आर्थिकदृष्ट्या पुनरुत्पादक समुदायावर आधारित पर्यटनालाही चालना दिली जाणार आहे. समुद्रकिनारे आणि झगमगत्या नाइटलाइफपलिकडे गोव्याला व्यापक आणि संपन्न असा सांस्कृतिक बहूविध वारसा आहे. हाच वारसा साजरा करण्यासाठी ‘रीडिस्कव्हर गोवा’ हा उपक्रम अधिकृतरित्या सादर करत एअरबीएनबी आणि गोवा पर्यटन विभागाने एकत्र येत राज्यभरातील होमस्टे क्षमता वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न केला आहे. यातून देशातील तसेच परदेशी पर्यटकांना गोव्यातील होमस्टेचे यजमान दर्जेदार पर्यटनाचा अनुभव देऊ करतील.

गोव्यात शाश्वत पर्यटन परिसंस्थेच्या विकासाला पाठबळ देणे आणि त्याचवेळी राज्यातील सध्याची आणि आगामी पर्यटन स्थळे प्रकाशझोतात आणणे यासाठीची दोन्ही पक्षांनी जपलेली बांधिलकी या उपक्रमातून अधोरेखित होत आहे. होमस्टे यजमानांना (होस्ट) माहिती पुरवणे आणि प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करून स्थानिक समुदायात रोजगारनिर्मिती आणि शाश्वत रोजगार निर्माण करण्याच्या पर्यटन क्षेत्राच्या क्षमता वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न या भागीदारीच्या माध्यमातून केला जाणार आहे. देशातील तसेच आंतरराष्ट्रीय पर्यटकांना गोव्याचा अभूतपूर्व अनुभव देऊ करणे आणि राज्यातील काही अप्रतिम मात्र फारशा परिचित नसणाऱ्या स्थळांना भेट देण्यासाठी अनोख्या स्थळांवर आणि मालमत्तांवर (प्रॉपर्टीज) या उपक्रमांमध्ये अधिक भर दिला जाईल.

सामंजस्य करारातील ठळक वैशिष्ट्ये:

पर्यटन विभाग, गोवा सरकार आणि एअरबीएनबी एकत्रित प्रयत्नांतून गोव्याला उच्च दर्जाचे पर्यटनस्थळ म्हणून चालना देण्याचे प्रयत्न करतील. यासाठी राज्यातील होमस्टे संस्कृतीवर भर देण्यात येईल तसेच प्रवाशांना नवा अनुभव देण्यासाठी किनारपट्टी वगळता इतर भागातील पर्यटन आणि होमस्टे पर्यटनावर भर दिला जाणार आहे. यासाठी देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध पर्यटन स्थळांच्या जाहिरात मोहिमा राबवल्या जातील.

होमस्टेचे यजमान आणि बीअॅण्डबी घरांचे मालक यांच्यात जबाबदार पर्यटनाचे महत्त्व, क्षमता वृद्धी, स्थानिक कायद्यांबद्दलची जागरुकता निर्माण करण्यासाठी कार्यशाळा आणि सत्रांचे आयोजन करणे, नोंदणी करण्यास यजमानांना प्रोत्साहन देणे त्याचप्रमाणे अधिकाधिक यजमान आणि मालमत्तांना या व्यासपीठावर आणण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्नांच्या माध्यमातून एअरबीएनबी पर्यटन विभागाच्या प्रयत्नांना साथ देणार आहे. राज्यात सर्वसमावेशक आणि समुदायाधारित पर्यटनाला चालना देण्यासाठी सध्या सक्रिय असलेल्या तसेच संभाव्य यजमानांना माहिती आणि मार्गदर्शन देऊ सक्षम करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

जगभरातील सुयोग्य पद्धती, कालानुरुप पर्यटनाचे ट्रेंड्स आणि होमस्टेबद्दलची माहिती वेळोवेळी पुरवून एअरबीएनबी पर्यटन विभागाला माहितीवर आधारित निर्णय घेण्यात साह्य करेल. क्षमता उभारणी आणि इतर विकासात्मक धोरणांमुळे राज्यात जबाबदार पर्यटनाला चालना मिळेल.

गोव्याचे पर्यटन मंत्री श्री. रोहन खंवटे आणि एअरबीएनबी भारत, दक्षिणपूर्व आशिया, हाँगकाँग आणि तैवानचे महाव्यवस्थापक अमनप्रीत बजाज यांच्या उपस्थितीत या सामंजस्य करारावर सह्या करण्यात आल्या.

सामंजस्य कराराबद्दल गोव्याचे पर्यटन मंत्री श्री. रोहन खंवटे म्हणाले, “आजवर फारसे लोकप्रिय नसलेले भाग निवडून तसेच शाश्वत विकासाला प्राधान्य देणे या बाबी गोवा सरकार आणि गोव्यातील पर्यटन विभागाच्या विचारांच्या मुळाशी कायमच आहेत. पर्यटन क्षेत्राला पुन्हा उभारी देण्यासाठी विविध योजना आणि स्रोतांचे वाटप करताना हा विचार नेहमीच प्राधान्यक्रमावर असतो. या भागीदारीत आमचा मुख्य भर आहे किनारपट्टी वगळता इतर भूभागावर… गोव्याच्या ग्रामीण भागातील महिलांना आर्थिक संधी मिळवून देणे, त्यांना सक्षम करण्यावर. सुक्ष्म उद्योगाला चालना देत स्थानिक समुदायाला सक्षम करणारी तसेच जगभरातील पर्यटकांना दर्जेदार पर्यटनाचा अनुभव देऊ करण्यावर भर देणारी अधिकाधिक सर्वसमावेशक पर्यटन परिसंस्था गोव्यात उभी करणे हे आमचे लक्ष्य आहे आणि एअरबीएनबीसोबत केलेला सामंजस्य करार हे त्याच दिशेने टाकलेले एक पाऊल आहे.”

एअरबीएनबी भारत, दक्षिणपूर्व आशिया, हाँगकाँग आणि तैवानचे महाव्यवस्थापक अमनप्रीत बजाज म्हणाले, “गोवा ही आमच्यासाठी एक प्राधान्यक्रमाची बाजारपेठ आहे. लोकप्रिय स्थळांसोबतच आडवाटांवरील स्थळांवरही पर्यटकांना दर्जेदार पर्यटनाचा अनुभव देण्याच्या एअरबीएनबीच्या प्रयत्नांना या भागीदारीमुळे बळ मिळेल. पर्यटन क्षेत्रातील आर्थिक लाभ शक्य तितक्या अधिक समुदायांपर्यंत पोहोचण्याची खातरजमा आम्हाला करायची आहे. त्यासाठी आम्ही स्थानिक होस्ट समुदायात सातत्याने गुंतवणूक करत आहोत. हे प्रयत्न अधिक दृढ करण्यासाठी गोवा पर्यटन विभागासोबत भागीदारी करून, देशातील तसेच आंतरराष्ट्रीय पर्यटकांमध्ये गोव्याला एक सर्वाधिक प्राधान्यक्रमाचे पर्यटन स्थळ बनवण्याच्या त्यांच्या उद्दिष्टाला हातभार लावत असल्याचा आम्हाला अभिमान वाटतो. यासाठी गोवा सरकारने केलेल्या लक्षणीय आणि कौतुकास्पद प्रयत्नांचे आम्ही साक्षीदार आहोत आणि राज्यात जबाबदार पर्यटनाला चालना देण्यासाठी त्यांच्यासोबत काम करण्यास आम्ही बांधिल आहोत. यासाठी जनजागृती मोहिमा, माहिती आणि ज्ञान देणारी सत्रे, क्षमता उभारणी कार्यक्रम राबवले जातील.”

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!