पणजी :
भाजप युवा मोर्चातर्फे शनिवारी पणजीत दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांच्या पुतळ्याचे दहन केल्याच्या कृत्यावर आम आदमी पक्षाने रविवारी निषेध व्यक्त केला. राज्य भाजप युवा मोर्चाने अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात वापरलेल्या अपशब्दाला प्रत्युत्तर देताना, लोकशाही आणि सुसंस्कृत समाजात असभ्यतेला स्थान नसल्याचे आप उपाध्यक्ष ॲड. सुरेल तिळवे म्हणाले.
भाजपच्या तजिंदर पाल सिंग बग्गा यांच्या सुटकेनंतर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी शनिवारी बग्गा आणि त्यांच्या कुटुंबाची दिल्लीत भेट घेतली. यावर ‘आप’चे उपाध्यक्ष वाल्मिकी नाईक म्हणाले, “बग्गा हा मोठा नेता नसला तरीही, भाजप त्याला कोणत्याही परिस्थितीत वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. बग्गा यांना तुरुंगात टाकले तर भाजपचे सर्व गुंड बेकायदेशीर आणि असंवैधानिक कृत्य करण्याआधी दोनदा विचार करतील. त्यांना कायदा आणि सुव्यवस्थेची भीती वाटू लागेल, जी भाजपसाठी घातक ठरेल. भाजपचा बोगस कारखाना बंद होईल या भीतीने सर्व भाजप सदस्य आकांड तांडव करत आहे. त्यात आता गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनीही झेप घेतली आहे”
“गोव्यातील सर्व महत्त्वाचे मुद्दे बाजूला ठेऊन, सावंत बग्गाला भेटायला गेले. यावरून भाजप अशा गुंडांना हिरो मानते हे स्पष्ट झाले आहे. बेरोजगारी, वीजपुरवठा खंडित होणे आणि पाण्याची टंचाई, तसेच स्वतःचे अपयश लपवण्यासाठी भाजप जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी बग्गा यांच्या अटकेला महत्त्वाचा मुद्दा बनवला आहे”, असे नाईक म्हणाले.
ते पुढे म्हणाले, “मध्यरात्री एका उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी त्यांच्या घरी तातडीच्या सुनावणीत याचिका ऐकण्याची ही पहिलीच वेळ आहे. एका राज्याच्या पोलिसांनी दुसऱ्या राज्याच्या पोलिसांविरुद्ध एफआयआर नोंदवण्याची ही पहिलीच वेळ आहे”.
आप यूथ विंगचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सिद्धेश भगत म्हणाले, “गोव्यातील गुन्हेगारीचे प्रमाण अलीकडे वाढले आहे. इतरही अनेक समस्या आहेत ज्याकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे. तथापि, आमच्या गोव्याच्या मुख्यमंत्री यांनी बग्गा या गुंडाला भेटण्यासाठी आपला वेळ दिला. आप आणि अरविंद केजरीवाल यांची लोकप्रियता वाढत असल्याचे पाहून भाजपची झोप उडाली आहे. त्यामुळेच भाजप युवा मोर्चाने गोव्यात अरविंद केजरीवाल यांचा पुतळा जाळला”.
आप यूथ विंगचे उत्तर गोवा अध्यक्ष पूजन मालवणकर, म्हणाले, “नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणातून भाजप पक्षाबाबतचे सत्य समोर आले आहे. देशभरातील दंगलींना भाजप हा पक्ष जबाबदार असल्याचे 91 टक्के लोकांचे मत आहे. 89 टक्के लोकांच्या मते भाजप हा निरक्षर गुंडांचा पक्ष आहे तर 73 टक्के लोकांचा असा विश्वास आहे की आपमध्ये सर्वात जास्त शिक्षित आणि प्रामाणिक लोक आहेत.”