‘…त्यामुळे मी गोव्यातील गावांना भेटी देत आहे’
पणजी:
देशाचे वास्तविक जीवन खेड्यात आहे. त्यामुळे मी गोव्यातील गावांना भेटी देत आहे,असे राज्यपाल पी.एस.श्रीधरन पिल्लई यांनी सांगितले.
महात्मा गांधींनीही ग्राम स्वराज्याचे समर्थन केले होते,असेही ते जुने गोवे, खोर्ली आणि कुंभारजुवे येथील ग्रामपंचायतींच्या निवडून आलेल्या प्रतिनिधींशी संवाद साधताना म्हणाले.
गोव्यातील लोक सुखी व्हावेत, अशी आपली इच्छा आहे. मिझोरामचे राज्यपाल असतानाच्या त्यांच्या दिवसांची आठवण करून देताना ते म्हणाले की या गावांतील निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींच्या वाहतूक, रोजगार, पायाभूत सुविधा अशा समस्या जाणून घेऊन त्यांनी समस्यांकडे संबंधित खात्यांचे लक्ष वेधण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.
यावेळी राज्यपालांनी डायलिसिस रुग्णांना आर्थिक मदतीचे वितरण केले. यावेळी समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई, कुंभारजुवेचे आमदार राजेश फळदेसाई , राज्यपालांचे सचिव मिहीर वर्धन, आयएएस, जुने गोवे सरपंच जनिता मडकईकर, कुंभारजुवेच्या सरपंच, बिंदी परब, उपसरपंच शिवा नाईक, उपजिल्हाधिकारी चंद्रकांत शेटकर, तिसवाडीचे मामलेदार दशरथ गावस, पंच सदस्य व इतर उपस्थित होते.
तद्नंतर राज्यपालांनी से कॅथेड्रल चर्च आणि ओल्ड गोवा चर्च संकुलाला भेट दिली. से कॅथेड्रलचे पॅरिश प्रिस्ट, फादर रोझारियो ऑलिव्हेरा यांनी राज्यपालांना तेथील विविध धार्मिक महत्त्वाची ठिकाणे दाखविली. यावेळी केंद्रीय पर्यटन आणि बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग राज्यमंत्री श्रीपाद नाईक हेही उपस्थित होते.