देश/जग

“साहित्यातून जपली जातात संस्कृती आणि मूल्ये”

कोचीमध्ये 'काळीज उसवलां'च्या मल्याळम अनुवादावर झाला विशेष परिसंवाद 

एर्नाकुलम :“साहित्य समाजाचे प्रतिबिंब आहे. भाषा बदलली तरी भावना बदलत नाहीत. मानवी मूल्ये, कुटुंबव्यवस्था, मैत्री, संस्कृती आणि सामाजिक जाणीवा जपण्याचे सामर्थ्य साहित्यामध्ये आहे,” या निष्कर्षावर प्रसिद्ध कोंकणी साहित्यिक उदय म्हाब्रो यांच्या आत्मकथनात्मक ‘काळीज उसवलां’ या कोंकणी पुस्तकाच्या मल्याळम अनुवाद ‘हृदयक्केट्ट अळिञ्ञप्पोल’ वरील परिसंवादात वक्त्यांनी एकमत व्यक्त केले. एर्नाकुलम येथील प्रभोध भवनात नुकत्याच झालेल्या या चर्चासत्रात पुस्तकाच्या साहित्यिक, सांस्कृतिक आणि सामाजिक आशयाचे सखोल विश्लेषण करण्यात आले.

कोंकणी कवी व साहित्यिक एन. बालकृष्ण मल्लय्या यांनी या पुस्तकाचा मल्याळम अनुवाद केला असून, प्रसिद्ध मल्याळम साहित्यिक कुंजी कोचू शेरूब यांच्या हस्ते पुस्तकाचे सादरीकरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभोध ट्रस्टचे खजिनदार तसेच कुडुंबी सेवा संघाचे अध्यक्ष ए. एस. श्यामकुमार होते. प्रभोध ट्रस्टचे सचिव आणि कोंकणी साहित्य अकादमीचे सदस्य सचिव डी. डी. नवीन कुमार यांनी उपस्थितांचे स्वागत केले.

या परिसंवादात केंद्रीय साहित्य अकादमी पुरस्कार विजेते आर. एस. भास्कर, अनुवादक एन. बालकृष्ण मल्लय्या, कोंकणी अकादमीचे अध्यक्ष पी. एन. कृष्णन, के. एन. आर. भट, प्रा. जी. मोहन राव, अॅड. डी. जी. सुरेश, आनंद जी. कामत, बी. एस. शेनॉय, कोंकणी कलाकेंद्राचे संस्थापक के. विजयकुमार, मुरलीधरन, अकबर यांच्यासह अनेक साहित्यप्रेमींनी सहभाग घेतला.

परिसंवादात पुस्तकाचा सविस्तर परामर्श घेण्यात आला. उदय म्हाब्रो यांच्या जीवनप्रवासातून उलगडणाऱ्या सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय अनुभवांवर चर्चा करताना, हे पुस्तक केवळ आत्मकथन न राहता एका समाजाचा, काळाचा आणि संस्कृतीचा दस्तऐवज असल्याचे वक्त्यांनी नमूद केले.

चर्चेतील एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे गोवा आणि केरळमधील निसर्ग, संस्कृती आणि सामाजिक जीवनातील साम्यस्थळे. दोन्ही राज्यांतील किनारी जीवनशैली, लोकपरंपरा, भाषिक वैविध्य आणि सांस्कृतिक सहअस्तित्व यामुळे निर्माण झालेले भावबंध पुस्तकातून प्रभावीपणे समोर येतात, असे वक्त्यांनी सांगितले.

लेखकाने आपल्या लेखनातून मांडलेली कुटुंबव्यवस्था, मैत्री, परस्पर विश्वास आणि नातेसंबंध यावरही विशेष चर्चा झाली. बदलत्या सामाजिक परिस्थितीत ही मूल्ये अधिक जपण्याची गरज असल्याचे मत अनेक वक्त्यांनी व्यक्त केले. आधुनिक कुटुंबव्यवस्थेत मुलांच्या संगोपनातील सकारात्मक आणि नकारात्मक पैलूंवरही यावेळी विचारमंथन झाले.

Malayalam Translation of Kaleej Uslava Discussed at Special Literary Meet in Kochi

पुस्तकात कोंकणी भाषा, साहित्य आणि सांस्कृतिक चळवळींचे जिवंत चित्रण करण्यात आल्याची दखल घेत, समाजजीवनात भाषिक चळवळींचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. लेखकाच्या बालपणीच्या राजकीय अनुभवांनी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडणीत बजावलेली भूमिका आणि त्याचा पुढील सामाजिक कार्यावर झालेला प्रभाव यावरही वक्त्यांनी भाष्य केले.

अनुवादक एन. बालकृष्ण मल्लय्या यांनी कोंकणीतील भावविश्व, स्थानिक शब्दसंपदा आणि सांस्कृतिक संदर्भ मल्याळममध्ये व्यक्त करताना आलेल्या भाषिक आणि आशयात्मक आव्हानांची माहिती दिली. अनुवाद हा केवळ भाषांतर नसून एका संस्कृतीचा दुसऱ्या संस्कृतीशी संवाद असल्याचे त्यांनी नमूद केले.

यावेळी गोव्यातील शेती आणि शेतकऱ्यांची स्थिती तसेच त्याची केरळमधील परिस्थितीशी तुलना या विषयावरही चर्चा झाली. ग्रामीण जीवनातील बदल, शेतीपुढील आव्हाने आणि सामाजिक परिवर्तनाचा परिणाम या मुद्द्यांवर उपस्थितांनी आपली मते मांडली.

परिसंवादाचा समारोप करताना एर्नाकुलमच्या महाराजा महाविद्यालयातील इतिहास विभागाचे प्राध्यापक डॉ. विनोद कुमार कल्लोलिकल यांनी चर्चेचा आढावा घेतला आणि उपस्थितांचे आभार मानले. प्रभोध ट्रस्टतर्फे आयोजित या कार्यक्रमाला साहित्यिक, अभ्यासक आणि कोंकणी-मल्याळम भाषाप्रेमींची विशेष उपस्थिती होती. परिसंवादातून भाषांतरित साहित्य हे दोन भाषांमधील संवादाचे प्रभावी माध्यम असून, भारतीय भाषांमधील सांस्कृतिक सेतू अधिक दृढ करण्यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!