देश/जग

विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला शशी थरूर यांचा पाठिंबा

नवी दिल्ली : विद्यार्थ्यांच्या परीक्षा प्रक्रियेतील अनियमितता, प्रश्नपत्रिका फुटी आणि परीक्षा रद्द होण्याच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी जंतरमंतरवरील आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांना खुले पत्र लिहून पाठिंबा व्यक्त केला आहे. तसेच सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना उपोषण मागे घेण्याचे आवाहन केले आहे.


थरूर यांनी आपल्या पत्रात मध्यमवर्गीय कुटुंबातील स्वतःच्या प्रवासाचा उल्लेख करत, गुणवत्ता आणि पारदर्शक परीक्षा प्रणाली ही सामान्य विद्यार्थ्यांच्या प्रगतीची एकमेव शिडी असल्याचे म्हटले आहे. प्रश्नपत्रिका फुटी, परीक्षा रद्द होणे आणि प्रक्रियेवरील विश्वास ढासळल्याने सर्वाधिक फटका सामान्य व मध्यमवर्गीय कुटुंबांतील विद्यार्थ्यांना बसत असल्याचे त्यांनी नमूद केले.


जंतरमंतरवर शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संतापाला त्यांनी योग्य ठरवत, “देश तुमचे म्हणणे ऐकत आहे. तुमचा रोष हा शिस्तभंग नसून विश्वासघाताविरुद्धचा आवाज आहे,” असे पत्रात म्हटले आहे.


सोनम वांगचुक यांना उद्देशून थरूर यांनी, “तुमच्या उपोषणाने देशाचे लक्ष या प्रश्नाकडे वेधले आहे. मात्र आता उपोषण सोडून संसदेच्या माध्यमातून हा प्रश्न मांडण्याची संधी द्यावी,” असे आवाहन केले.


केंद्र सरकारलाही विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधींशी संवाद साधण्याचे आवाहन करत, लोकशाहीत तरुणांच्या प्रश्नांवर संवाद साधणे ही सरकारची जबाबदारी असल्याचे थरूर यांनी स्पष्ट केले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!