
जंतर-मंतरवर शरद पवारांची अभिजीत दिपकेंशी भेट
नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या नीट (NEET) प्रश्नपत्रिका फुटीविरोधातील आंदोलनस्थळी भेट देत आंदोलनाचे नेतृत्व करणारे अभिजीत दिपके यांची भेट घेतली. आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिस कारवाईच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आंदोलनकर्त्यांशी संवाद साधून त्यांच्या मागण्यांना पाठिंबा व्यक्त केला.
शरद पवार यांच्यासमवेत खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अन्य नेतेही उपस्थित होते. आंदोलनादरम्यान जखमी झालेल्या विद्यार्थ्यांची विचारपूस करत त्यांनी परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले.
नीट प्रश्नपत्रिका फुटीप्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी आंदोलनकर्त्यांकडून करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांवरील कथित पोलिस कारवाईनंतर आंदोलनाला देशभरातील विविध राजकीय पक्ष आणि संघटनांचा पाठिंबा मिळत असून, शरद पवार यांच्या भेटीमुळे या आंदोलनाला आणखी राजकीय बळ मिळाल्याचे मानले जात आहे.
दरम्यान, जंतर-मंतरवरील आंदोलन कायम असून, परीक्षा व्यवस्थेतील कथित गैरव्यवहार आणि प्रश्नपत्रिका फुटीच्या घटनांबाबत कठोर कारवाई करण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी पुन्हा केली आहे. आंदोलनाच्या पुढील टप्प्याबाबत लवकरच निर्णय जाहीर करण्यात येणार असल्याचे आंदोलनाच्या नेतृत्वाकडून सांगण्यात आले.






