भारत जोडोच्या समर्थनात संविधान जनजागृती रॅली
वडूज (अभयकुमार देशमुख) :
राहुल गांधींची भारत जोडो यात्रा सात नोव्हेंबरला देगलूर(नांदेड) येथे महाराष्ट्रात प्रवेश करीत आहे. यात्रेच्या माध्यमातून जे महत्वाचे मुद्दे मांडले जात आहेत त्यांच्या प्रचार प्रसारासाठी भारत जोडो यात्रेचे समन्वयक, जेष्ठ विचारवंत योगेंद्र यादव व सामाजिक चळवळीतील कार्यकर्त्यांची संविधान जनजागृती रॅली तीन व चार नोव्हेंबरला सातारा जिल्ह्यातून जाणार असून विविध ठिकाणी संविधान बचाव प्रबोधन कार्यक्रम होणार आहेत.
केंद्रातील मोदी सरकारने भारतीय संविधानाच्या अगदी विरोधी धोरण अवलंबले आहे. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असलेल्या विचारांना धक्का बसला असून भविष्यात संविधानच बदलले जाईल अशा दिशेने केंद्र सरकारची वाटचाल आहे. संविधानावर होत असलेल्या आक्रमणाची माहिती जनतेला देण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातील सामाजिक संस्था, परिवर्तन चळवळीतील कार्यकर्ते, सिव्हिल सोसायटी सद्स्य व विविध संघटनांचे पदाधिकारी दोन नोव्हेंबर रोजी कोल्हापूर येथून ‘संविधान जनजागृती’ रॅली सुरु करणार आहेत. कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर या जिल्ह्यातून जनजागृती करीत ही रॅली सात नोव्हेंबरला देगलूर येथे पोहोचून भारत जोडो यात्रेत सामील होईल.
संविधान जनजागृती रॅली सातारा जिल्ह्यात 3 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता कराड येथे येणार आहे. मा. योगेंद्र यादव व सर्व सहकारी कराड शहरात पदयात्रा करणार करणार आहेत. सायं. 5 वाजता सातारा शहरात रॅलीचे आगमन होऊन व रमाबाई स्मारक ते डॉ.आंबेडकर पुतळा, राजवाडा अशी पदयात्रा होईल. दि.4 नोव्हेंबर रोजी कोरेगाव, पुसेगाव, वडूज, दहिवडी मार्गे फलटण असा रॅलीचा मार्ग आहे.
सातारा जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्त्या वर्षा देशपांडे ‘संविधान जनजागृती’ रॅलीच्या संयोजक आहेत. सातारा जिल्हा काँग्रेस कमिटी व चळवळीतील अनेक कार्यकर्ते या यात्रेमध्ये सहभागी होतील असे वर्षा देशपांडे यांनी सांगितले. दरम्यान भारत जोडो यात्रेचे जिल्हा समन्वयक रणजितसिंह देशमुख, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस उदयसिंह पाटील, सेक्रेटरी राजेंद्र शेलार व काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी वर्षा देशपांडे यांची भेट येऊन रॅलीच्या नियोजनाबाबत चर्चा केली.